मराठवाडा पदवीधर निवडणूक : उदगीरातील प्रत्येक मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टिंग, व्हिडीओग्राफी

युवराज धोतरे
Monday, 30 November 2020

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) उदगीर शहर व तालुक्‍यातील तेरा मतदान केंद्रांवर पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेची वेब कास्टिंग व व्हिडिओग्राफी होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी दिली आहे.

उदगीर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) उदगीर शहर व तालुक्‍यातील तेरा मतदान केंद्रांवर पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेची वेब कास्टिंग व व्हिडिओग्राफी होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी दिली आहे. उदगीर शहर व तालुक्यातील एकूण तेरा मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर चार जणांची नेमणूक करण्यात आली आहे. यात एक मतदान केंद्र अधिकारी, सहायक, दोन पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एकूण तेरा केंद्रांसाठी सात झोनल अधिकारी तैनात करण्यात आले असून पैकी दोन झोनल अधिकारी राखीव ठेवण्यात आले असल्याचेही श्री मेंगशेट्टी यांनी सांगितले.

पदवीधर मतदारसंघात निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या निर्देशानुसार १३ मतदान केंद्रांवर वेब कोटिंग व व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. प्रथमच या निवडणुकीसाठी वेब कास्टिंग होत असून ही निवडणूक पारदर्शक स्वरूपात पार पडण्यासाठी प्रशासनाने हे नियोजन केल्याचे दिसून येते. उदगीर शहरातील गटसाधन केंद्र ७५८, जिल्हा परिषद शाळेची मुख्य इमारत २१७, लालबहादूर शास्त्री विद्यालय पूर्व बाजू ५४०, लालबहादूर शास्त्री विद्यालय पश्चिम बाजू ६३८, शिवाजी महाविद्यालय पूर्व बाजू ९२९, पश्चिम बाजू ६३८, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा २२५, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेर ३५३, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडार ३३६, जिल्हा परिषद प्रशाला देवर्जन २७३, जिल्हा परिषद प्रशाला वाढवणा ३७०, जिल्हा परिषद प्रशाला नळगीर ३७२, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागलगाव ३७२ असे उदगीर शहर व तालुक्यातील केंद्रनिहाय मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या प्रक्रियेसाठी तहसीलदार रामेश्वर गोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे, मंडळ अधिकारी, तलाठी व नगरपालिकेचे कर्मचारी काम करित आहेत.

चव्हाण व बोराळकर यांच्यात लढत
मराठवाडा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत विद्यमान आमदार सतीश चव्हाण व भाजप पुरस्कृत शिरीष बोराळकर यांच्यात लढत होणार अशी चिन्हे दिसत आहेत. या दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींनी त्या-त्या मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची बसण्याची व मतदान व्यवस्थित करता यावं यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर नियोजन केल्याचे दिसून येत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Web Casting And Videography At Each Polling Booth In Udgir