राज्यातील पिके पाण्यात; मात्र केंद्रीय पथकाचा पत्ता नाही, राजू शेट्टींचा सवाल

जलील पठाण
Monday, 19 October 2020

शेतकऱ्यांच्या या संकटात राज्याने २५ तर केंद्राने ७५ टक्के मदतीचा वाटा उचलावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

औसा (जि.लातूर) : परतीच्या पावसामुळे मराठवाड्यासह राज्यातील वीस जिल्ह्यात खरीप पिकासह घराचे नुकसान झाले. यात शेतीचे जवळपास पन्नास हजार कोटींच्या वर नुकसान झाले आहे. राज्यात सद्यःस्थितीत ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना अद्यापि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे एकही पथक आलेले नाही. संकट काळात राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक विचाराने केंद्राने बिहारला जशी मदत केली होती, तशी करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या या संकटात राज्याने २५ तर केंद्राने ७५ टक्के मदतीचा वाटा उचलावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. ते सोमवारी (ता.१९)औसा तालुक्यातील तुंगी (बु ) येथे नुकसानी पाहणीसाठी आले असताना बोलत होते.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकले सोयाबीन, टोमॅटो, मका, बाजरी

केंद्रीय आपत्ती निवारण समितीने अतिवृष्टीने बाधित परिसरात येऊन नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्याची गरज आहे. दरवेळेस बिहारमध्ये आशा घटना घडल्यावर ही टीम काही तासांत पोचून मदत करते. मग महाराष्ट्राला का नाही? संकट काळात राजकीय जोडे बाजूला ठेवून मानवी मूल्याची जपणूक करीत संकटात धावून जाण्याची भारतीय परंपरा असतांना महाराष्ट्राला याचा वाईट अनुभव येत आहे. गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे, जमिनीचे व शेतीमालाचे नुकसान होते. भविष्यात ही अशी संकटे शेतकऱ्यांना झेलावी लागणार आहेत. कारण की जागतिक तापमानामुळे शेती व्यवसायावर अनिष्ट परिणाम होत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत केंद्राने राज्य कोणाच्या ताब्यात आहे हा विचार न करता मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने याबाबत आपल्याकडे जसे केंद्रीय आपत्ती निवारण कक्ष आहे. त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष उभारणीसाठी पुढाकार घेऊन जागतिक बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. यात कुठलेही राजकारण न करता राज्यात तात्काळ एनडीआरएफची टीम पाठवून तातडीने मदत कशी होईल. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

शरद पवार कृषी विधेयकावर बोलले; मालाच्या किंमतीची गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध

तालुक्यातील सर्वच मंडळात पडलेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे अगोदर उडीद, मूग, आता सोयाबीन, तूर, भाजीपाला व ऊसाचे मोठे नुकसान झाले याच अनुषंगाने राजू शेट्टी तालुक्यातील नुकसानीची तुंगी (बु) भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश माडजे, स्वस्तिक पाटील, इम्रान पटेल, चंद्रकांत चव्हाण हे उपस्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When Will Central Team Visit Damaged Fields, Raju Shetty's Question