बीडमध्ये एकेक संस्थान होतेय खालसा, भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सक्रिय सभासद, बूथप्रमुख अशा निवडीनंतर तालुकाध्यक्ष आणि नंतर जिल्हाध्यक्ष असे या निवडीचे टप्पे आहेत. 

बीड - भाजपमध्ये जिल्हा संघटनेच्या निवडींच्या प्रक्रियेने जोर धरला असून, काही तालुकाध्यक्षांसह जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राज्यासह जिल्हा परिषदेतील गेलेली सत्ता आणि बीडमध्ये भाजपची पीछेहाट यामुळे नवा अध्यक्ष निवडताना श्रेष्ठींचीही कसोटी आहे. 

बीडमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असली, तरी निष्ठा, ज्येष्ठता आणि संघटनकौशल्य आणि पक्षाने घालून दिलेल्या नियमांच्या कसोट्यांवर उतरणाऱ्यांचीच निवड होणार आहे. सामाजिक समतोल आणि राजकीय फायद्या-तोट्याचे गणितदेखील निवडीत महत्त्वाचे ठरणार आहे. 

रमेश पोकळे यांना जिल्हाध्यक्षपदावर दोन टर्म काम करण्याची संधी मिळाली. लोकनते गोपीनाथराव मुंडे यांनी निवड केलेल्या पोकळे यांना पुढे पंकजा मुंडे यांनी देखील संधी दिली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सक्रिय सभासद, बूथप्रमुख अशा निवडीनंतर तालुकाध्यक्ष आणि नंतर जिल्हाध्यक्ष असे या निवडीचे टप्पे आहेत. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

दरम्यान, काही तालुकाध्यक्षांच्याही निवडी होणे बाकी आहे. या निवडीनंतर जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी श्रेष्ठींकडून चाचपणी सुरू आहे. यात ज्येष्ठता, पक्षनिष्ठा, संघटनकौशल्य, आगामी निवडणुकांसाठी राजकीय फायदा-तोटा याचेही गणित लावले जात आहे.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी हे पद घ्यावे, असा मतप्रवाह संघटनेत आहे. त्यामुळे इतरांमधून डावलल्याची नाराजी येणार नाही, असेही गणित मांडले जात आहे; मात्र त्यांना जिल्ह्यात तेवढा वेळ देणे शक्‍य होईल का, त्यांना या पदात इंटरेस्ट आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या पद घेण्याऐवजी अप्रत्यक्ष संघटनेत लक्ष घालतील असेही बोलले जाते. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

पदासाठी दुसरे नाव आमदार सुरेश धस यांचे आहे. धस आक्रमक असून, संघटनकौशल्याचा त्यांचा हातखंडा पक्का आहे; मात्र त्यांच्याकडे आमदारकी असल्यामुळे आणि आष्टी-परळी अंतर हा देखील मुद्दा आहे. तिसरे नाव रमेशराव आडसकर यांचे आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य त्यांच्यात असून विधानसभेची भरपाई या त्यांच्या दोन जमेच्या बाजू आहेत; मात्र संघटनेसाठी वेळ देण्याची तयारी ते करतात का, हे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

इच्छुकांची गर्दी; पण दोन्ही बाजूंनी अडचणी 
जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी असली, तरी भाजप संघटनेत किमान तीन वर्षे सक्रिय सभासद असलेल्यांनाच या निवडणुकीत भाग घेता येतो ही प्रमुख अट आहे. त्यामुळे काही जण अनेक वर्षांपासून भाजपमध्ये असले तरी सक्रिय सभासद नाहीत ही अडचण आहे. तर काहींची निष्ठा असली तरी त्यांची उपयुक्तता देखील श्रेष्ठींसमोर अडचणीचा मुद्दा आहे. त्यामुळे निष्ठेसह ज्येष्ठता, उपयुक्तता आणि राजकीय व सामाजिक समतोल या कसोट्यांवरच नवा अध्यक्ष ठरेल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who Is The District President Of BJP In Beed?