
उस्मानाबाद पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांतील महत्त्वाच्या उपसभापतीचे खांदेपालट होत असल्याने त्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांतील महत्त्वाच्या उपसभापतीचे खांदेपालट होत असल्याने त्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडुन आलेल्या पण सध्या भाजपच्या आमदाराचे समर्थक असलेल्या सदस्यांमधील नाराजी दुर करण्यासाठी नेतृत्वाकडून ही खांदेपालट करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पंचायत समितीच्या सदस्यांमध्ये सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजप समर्थकांमध्ये उपसभापती पदासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. पहिल्या टर्ममध्ये तेव्हा चिलवडी गणाचे शाम जाधव यांना संधी दिलेली होती.
त्यानंतर अडीच वर्षानंतर पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले होते. नव्या अडीच वर्षासाठी संजय लोखंडेसह राहिलेल्या सदस्यांनाही संधी देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले होते. आता सांजा गणाचे सदस्य आशिष नायकल यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. उपसभापती पदासाठी निवडीचा कार्यक्रम २३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता या निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला त्या दिवशीपासून सुरुवात होत असल्याने त्याचाही परिणाम या निवडीमागे असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर आपल्या गटाचा वरचष्मा राहावा यासाठी आतापासुनच तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. तालुक्याची महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पंचायत समितीला राजकीय दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. त्या दृष्टीने अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर ही निवड होणार असल्याने त्याचा निवडणुकीवर किती परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या निवडीवेळी काही सदस्यांमध्ये नाराजीचा सूर दिसुन आल्याने विरोधकांच्यावतीने हे सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र सदस्य फुटुनही बहुमताचा आकडा गाठता न आल्याने बंड थंड झाल्याचे दिसुन आले होते. अन्यथा कळंब पंचायत समितीप्रमाणे उस्मानाबादमध्ये सुद्धा धक्का देण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. त्याचाच परिणाम म्हणून सदस्यांना नाराज ठेवुन चालणार नाही याची दक्षता पक्षीय पातळीवर घेतल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे अडीच वर्षातील काळामध्ये दुसऱ्यांदा पद वाटणी करण्याची वेळ नेतृत्वावर आल्याचे बोलले जात आहे.
संपादन - गणेश पिटेकर