डॉ. भारतभूषण क्षीरसागरांमुळेच जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

  • भाजपचा क्षीरसागरांवर पलटवार 
  • बीडच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच झाला पराभव 
  • विधान परिषदेसाठी भाजपला दोष दिल्याचा आरोप 
  • शिवसेनेची मदत घेण्याच्या मुद्द्यावर कचखाऊ भूमिका 

बीड - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाचे भाजपवर खापर फोडल्याच्या मुद्द्यावर भाजपने पलटवार केला आहे. त्यांचा पराभव हा त्यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यामुळेच झाल्याचा आरोप करीत विधान परिषदेसाठी हा केविलवाणा खटाटोप असल्याचा टोलाही भाजपने लगावला आहे.

2014 च्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर विजयी व्हावेत, यासाठी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मोठे प्रयत्न करीत प्रत्येकाला फोन केले. यावेळी मात्र त्यांनी भाजपच्या एकाही जबाबदार पदाधिकाऱ्याला फोन केला नाही. डॉ. क्षीरसागर यांनाच जयदत्त क्षीरसागर विजयी व्हावे असे वाटत होते का, अशी शंका असल्याचा थेट आरोप करण्यात आला. 

हेही वाचा - खळबळजनक! पाटोदा येथे भावाकडून सख्ख्या भावाचा खून

शहरभर झालेल्या खड्ड्यांमुळेच जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. तीन दिवसांपूर्वी चिंतन बैठकीत जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाला भाजपचे काही पदाधिकारी जबाबदार असल्याची भावना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनीही व्यक्त केली होती. अगदी जयदत्त क्षीरसागर यांनीही भाजपच्या काही लोकांनी सोयीने काम केल्याचे लक्षात ठेवले जाईल, असे म्हटले होते. रविवारी (ता. आठ) भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, भाजप नेते राजेंद्र मस्के, जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर, तालुकाध्यक्ष चंद्रकांत फड, प्रा. देविदास नागरगाजे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा - वासनांध तरुणाचा ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भाजपमुळेच पराभव झाल्याचे खोडसाळ मत काहींनी व्यक्त केले, तर काहींना जाणीवपूर्वक बोलायला लावल्याचा आरोपही करण्यात आला. क्षीरसागरांच्या घरातच समन्वयाचा अभाव होता. शहरभर सर्वत्र खड्डे पडलेले होते. यापूर्वीच्या निवडणुकांत रात्रीतून रस्ते केले जात, तशी तगडी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. यावेळी खड्डे का बुजले नाहीत, जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव व्हावा म्हणूनच ते बुजले नाहीत, असेही पोकळे म्हणाले.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

जयदत्त क्षीरसागर यांनीही भाषणात रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे मतदानात खड्डे पडल्याचा उल्लेख केला; परंतु त्यांना बंधू भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर थेट बोलता आले नाही. त्यांना क्‍लीन चिट दिल्याचे सांगत हा सर्व विधानपरिषदेसाठी खाटाटोप असल्याचा आरोपही करण्यात आला. क्षीरसागरांचे होमपिच नवगण राजुरी व बालेकिल्ला अशी ओळख असलेले बीडही त्यांना प्लस करता आले नाही. 

शिवसेनेवर आखपाखड; पण "झेडपी'च्या मदतीबाबत "कच' 
दरम्यान, शिवसेनेसोबत युती नको, अशी पदाधिकाऱ्यांची पूर्वीपासून धारणा होती. या निवडणुकीत माजलगाव, बीड, आष्टी, गेवराईत शिवसेनेने भाजपविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप रमेश पोकळे यांनी केला. गेवराईत शिवसेनेने बंडखोरी केली, त्याला लगाम लावण्याऐवजी रसद पुरविल्याचे ते म्हणाले. यानंतर आगामी काळात आणि विशेषत: जिल्हा परिषदेत शिवसेनेची मदत घेणार का, या प्रश्नावर त्यांनी चांगलीच कच खाल्ली. याबाबत पंकजा मुंडे निर्णय घेतील, असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Jaydatta Kshirsagar was defeated?