आठवडाभरात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

वसमत तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. आठवडा भरातच दोन शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

वसमत(जि. हिंगोली) : कर्ज व नापिकीला कंटाळून २५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२९) तालुक्यातील रोडगा येथे घडली. या बाबत वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. वसमत तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. 

सुनील प्रल्हाद कदम (वय २५ रा. रोडगा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मयत सुनील कदम यांच्याकडे पाच एकर शेती आहे. या शेतीवर वसमत येथील भारतीय स्टेट बँकेकडून वडीलांच्या नावावर दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. 

हेही वाचा - केळी पिकाला लॉकडाउननंतर उन्हाचा फटका 

कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न
 
परंतु, सततच्या नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे ? या चिंतेत ते होते. तसेच मागच्या वर्षी खरीप व रब्‍बी हंगामातील पिकांचे पावसाने नुकसान झाले. त्यामुळे कुटुंबीयाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्नही त्‍यांना भेडसावत होता. शुक्रवारी (ता.२९) घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेले होते. 

पोलिसांची घटनास्थळी धाव

श्री. कदम हे एकटेच घरी होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी छताच्या लोखंडी कडीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शेजाऱ्यांना समजल्यावर त्यांनी ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. तसेच घटनास्थळी वसमत ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक बळिराम बंदखडके पथकासह दाखल झाले. 

आकस्मात मृत्यूची नोंद

त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. या बाबत मयत सुनील कदम यांच्या पत्नी गोकर्णा कदम यांच्या खबरीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

आठवड्यातील दुसरी घटना

वसमत तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. तालुक्यातील अकोली येथील शेतकरी तुकाराम बाभनराव सावंत (वय ५०) यांनी विष पिऊन आत्‍महत्या केली. या बाबत रघुनाथ सावंत यांच्या तक्रारीवरून वसमत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथे क्लिक कराCovid-19 : वसमतमध्ये चौघे बाधित, हिंगोली जिल्ह्यात नवे पाच रुग्ण 

पाट खतण्याच्या कारणावरून एकास मारहाण

सेनगाव : शेतीच्या सामायीक धुऱ्यावरून पाट खतण्याच्या कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२९) तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे घडली. याबाबत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगाम जवळ आल्याने ही कामे वेगाने सुरू आहेत. रात्रंदिवस ट्रॅक्‍टरच्या मदतीने मशागतीची कामे सुरू झाली आहेत. सेनगाव तालुक्‍यातील मन्नास पिंपरी येथे हनुमान शिंदे यांना शेत शेजाऱ्यांनी सामायीक धुऱ्याजवळ पाट खतण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. तुला झोपेतच खतम करतो, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within A Week, Two Farmers Lost Their Lives Hingoli News