बिबट्याच्या हल्ल्यात जीव वाचला; पण शालनबाईंची वाचा कायमची गेली, जगणे झाले मुश्‍किल

0Leopard_20Attack_20on_20calf_20at_20Phursungi_20Pune
0Leopard_20Attack_20on_20calf_20at_20Phursungi_20Pune

आष्टी (जि.बीड) : पती दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून, मुलगा पुण्यात कसेबसे पोट भरतोय. प्रपंचासाठी शेतमजुरीचे काम करतानाच औषधपाण्याची व्यवस्था करण्याची चिंता. अशात पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने जीवघेणा हल्ला करून नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगातून सुदैवाने जीव वाचला तरी वाचा मात्र कायमच गेली. त्यामुळे आता पुढे रोजंदारीचा प्रश्न, औषधोपचार आणि म्हातारपण अशा स्थितीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान पारगाव जोगेश्वरी येथील शालनबाई शहाजी भोसले (वय ५५) यांच्यासमोर उभे ठाकले आहे.


आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथे नरभक्षक बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या शालन भोसले या चौदा दिवसांच्या उपचारानंतर नगरहून घरी परतल्या आहेत. त्यांच्यावर ता. २९ नोव्हेंबर रोजी नरभक्षक बिबट्याने सकाळी अकराच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला होता. त्यात त्यांच्या मानेला तीक्ष्ण दातांची खोलवर जखम झाल्याने स्वरनलिकेला मोठी इजा होऊन त्यांची वाचा गेली आहे. शालनबाईंची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यांचे पती शहाजी भोसले हे गेल्या दोन वर्षांपासून अर्धांगवायूच्या विकारामुळे अंथरुणाला खिळून आहेत.

घरची अवघी एक एकर शेती असून, त्यातून काहीच हाती येण्याची अपेक्षा नसल्याने त्यांचा मुलगा विनोद हा पत्नीसह पुण्यात राहून खासगी कंपनीत काम करतो. घरी आई-वडील. अंथरुणावर असलेल्या पतीची शालनबाई सेवा करीत होत्या. याशिवाय चरितार्थालाही शेतात काम करून हातभार लावत होत्या. पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शालनबाईंच्या जीवावरच संकट आले होते. सुदैवाने या हल्ल्यातून त्या वाचल्या. परंतु दुर्दैव येथेही आड आले आहे.

या हल्ल्यानंतर चौदा दिवस उपचार घेऊन शालनबाई नगरहून गावाकडे परतल्या आहेत. मात्र, मानेला खोलवर जखम झाल्याने त्यांच्या स्वरनलिकेला गंभीर इजा होऊन बोलणे बंद झाले आहे. वाचा गेल्याने शालनबाईंना मोठा मानसिक धक्का बसण्याबरोबरच दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय मुख्य आर्थिक ओढाताणीची चिंता त्यांना सतावत आहे. सरकारी मदत मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप मिळालेली नाही. शिवाय या मदतीने त्यांच्यावर झालेला शारीरिक व मानसिक आघात भरून येणार नाही, हेही वास्तव आहे.


कुटुंबावर संकट
शेतीतून पिकत नसल्याने उदरनिर्वाहासाठी मुलगा विनोदला पुण्याला जावे लागले. गावाकडे अंथरुणावर असलेल्या वडिलांची काळजी शालनबाई घेत होत्या. कसाबसा संसार चालत होता. आता आई-वडील दोघेही जागेवर पडून असल्याने त्यांची देखभाल, औषधोपचार करून संसार चालवणे मुलासाठी अवघड बनले आहे. कुटुंबावर खूप मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे.

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वन विभागाच्या वतीने पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत पीडित कुटुंबाला देण्यात येते. तसेच जखमींनाही आर्थिक मदतीची तरतूद आहे. त्यानुसार हल्ला झाल्याबरोबर उपचारासाठी म्हणून वन विभागाच्या वतीने जखमी शालनबाई यांना सव्वा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्यात येते. त्यानुसार वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर शालनबाई भोसले यांचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यांना पाच लाख रुपयांची मदत वन विभागातर्फे मिळण्याची तरतूद आहे.
- श्याम शिरसाट, वन परिक्षेत्र अधिकारी, आष्टी



असा झाला होता शालनबाईंवर हल्ला.
तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील रहिवासी असलेल्या शालनबाई शहाजी भोसले रविवारी (ता. २९ नोव्हेंबर) रोजी आपल्या घराच्या पाठीमागील शेतात काम करीत होत्या. त्यांच्याच भावकीतील शारदा सयाजी भोसले, स्वाती विजय भोसले, नातू राहुल विजय भोसले, पुतण्या विजय सयाजी भोसले हे सर्व शेजारील शेतात काम करत होते. सकाळी अकराच्या सुमारास बिबट्याने पिकातून अचानक येत शालनबाईंवर पाठीमागून झडप घातली. जबड्यात शालनबाईंची मान घट्ट धरून बिबट्या निघून चालला होता.

हे पाहून जवळ असलेल्या पुतण्या विजय भोसले याने आपल्या जीवाची पर्वा न करता त्याच्यामागे धावत जाऊन पाय धरून बिबट्याच्या तोंडातून शालनबाईंना सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात बिबट्याने शालनबाईंना सोडून विजयवर हल्ला चढविला. धाडसाने प्रतिकार करून विजय या हल्ल्यातून वाचला. हल्ल्यात बिबट्याने दोघांनाही जवळपास चाळीस-पन्नास फूट फरफटत नेले. यावेळी शेजारील लोकांची भीतीने गाळून उडून आरडाओरडा झाला. सर्वांनी एकत्रित येऊन बिबट्याच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला. याच दिवशी सायंकाळी पारगाव जोगेश्वरी येथे सायंकाळी साडेसहा वाजता बिबट्याने सुरेखा भोसले यांचा बळी घेतला. त्यामुळे आष्टी तालुका हादरून गेला होता.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com