बीड जिल्ह्यातील महिला रानडुकराच्या हल्ल्यात जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात रानडुकराच्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला जखमी झाली आहे. रानडुकरांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी ठरल्याचे यातून दिसत आहे.

केज (जि. बीड) - शेतात कापूस वेचणी करत असलेल्या महिलेवर शनिवारी (ता. सात) रानडुकराने हल्ला केल्याची घटना तालुक्‍यातील आडस येथे घडली. मंदाकिनी दशरथ खाडे (वय 60, रा. आडस) असे जखमी महिलेचे नाव आहे. रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी ठरल्याचे यातून दिसत आहे.

परतीच्या पावसाने तलावातील पाणी वाढल्याने पिके जोरात वाढली आहेत. त्यामुळे रानडुकरांची संख्याही या भागात वाढली आहे. दरम्यान, रानडुकरांच्या हल्ल्यामुळे जखमी होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत तसेच रानडुकरांकडून पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही वनविभाग यावर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत आहे. तालुक्‍यात सध्या शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. शेतातील कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे.

हेही वाचा - आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत

आडसचा आठवडे बाजार असूनदेखील मंदाकिनी खाडे गावापासून काही अंतरावर असणाऱ्या खाड्याचा मळा या आपल्या शेतात एकट्याच कापसाची वेचणी करत होत्या. दुपारी दीडच्या सुमारास अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली; मात्र जवळ कोणीच नसल्याने रानडुकराने त्यांना जोराची धडक देऊन उजव्या हाताला चावा घेतला.

हेही वाचा - अवैध दारूविक्री बंदसाठी महिलांचे उपोषण

हल्ल्यानंतर घाबरलेल्या महिलेने रानडुकरांच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका करून जवळचा गोठ्याजवळ धाव घेतली. शेजाऱ्यांच्या मदतीने जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्‍टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman was injured

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: