अठरा वर्षापूर्वीच मुली होताहेत गरोदर, कुणालाच नाही लाजशरम....

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड - सध्या समाजातील हैवान पिसाळल्याने महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. हिंगणघाटच्या घटनेनंतर अशा घटनांत वाढच होत असून एकट्या बीड जिल्ह्यात दोन दिवसांत बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत.

परळी शहरात सतरा वर्षांच्या मुलीने बाळाला जन्म दिला आणि तिने ते बाळ झुडपात फेकून दिले. या घटनेत संबंधित मुलीचा तपास लागला तसेच या बाळाला मंत्री धनंजय मुंडे यांनी दत्तकही घेतले. मात्र, अशा घटनांना आवर घालण्यासाठी राज्य शासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजातील या हैवानांना जरब बसेल असा धडा शिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त होतेय. 

अत्याचार झाल्यामुळे विवाहितेची आत्महत्या 

परळी वैजनाथ तालुक्यातील गोपाळपूर येथे सोमवारी (ता. २४) रात्री एकाने घरात घुसून पंचवीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केला. अत्याचार झाल्यामुळे तिने विष घेऊन आत्महत्या केली. गोपाळपूर येथे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास संबंधित विवाहिता घरी एकटीच होती. त्यावेळी एकाने घरात घसून तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार झाल्याने तिने घरात फवारणीसाठी आणलेले विषारी औषध घेतले.

काहींनी तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मंगळवारी (ता.२५) उत्तरीय तपासणी झाली. पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

केज तालुक्यातील पिराचीवाडी येथे तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना सोमवारी (ता.२४) मध्यरात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यातील आरोपीविरोधात मंगळवारी केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यात या घटनेमुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. यातील आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. पिराचीवाडी शिवारातील बेलाचे तुकडे या शेतातील वस्तीवर तेरा वर्षीय मुलगी झोपलेली होती.

ती झोपेत असताना शेजारील सचिन बंडू सिरसाट हा रात्री साडेदहाच्या सुमारास तेथे आला. त्याने झोपेत असलेल्या तरुणीचे तोंड दाबून चापटाने मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे घडलेल्या घटनेने भयभीत झालेल्या पीडितेने मंगळवारी केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे तपास करीत आहेत. 

सतरा वर्षांच्या मुलीने दिला बाळास जन्म 

परळी वैजनाथ येथे सोमवारी (ता. २४) रात्री साडेआठच्या सुमारास रेल्वे पटरीच्या शेजारी झाडाझुडपांत कपड्यात गुंडाळून फेकलेले स्त्रीजातीचे नवजात अर्भक आढळले. नवजात बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने परिसरातील रहिवाशांनी तिकडे धाव घेतली. या बाळाला तत्काळ उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. यानंतर गुप्त विभागाच्या पथकाचे प्रमुख रमेश सिरसाट यांनी सहकार्यांसह प्रयत्नांची शर्थ करीत १८ तासांत १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.

या घटनेची माहिती मिळताच बाळाचे पालकत्व सामाजिक न्याय व विशेष सहायमंत्री धनंजय मुंडे व खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले व तिचे नामकरणही करण्यात आले. सध्या परळीत महाशिवरात्री महोत्सव सुरू असल्याने या मुलीचे नाव शिवकन्या ठेवण्यात आले आहे. 

काळ्या इतिहासाला डोके वर काढू देऊ नका - मेटे 

परळीत स्त्री अर्भकाला रेल्वे पटरीजवळ काटेरी झुडपात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, ही दुर्दैवी बाब आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या मुलीचे पालकत्व स्वीकारणे कौतुकाची बाब असून अशा घटनांतून पुन्हा परळीच्या काळ्या इतिहासाने डोके वर काढू नये याची दक्षता घ्यावी, असे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले. 

परळीच्या घटनेवरून विनायक मेटे यांनी कौतुक आणि सल्ला देणारा संदेश आपल्या फेसबुकवर टाकला आहे. परळीच्या घटनेने काळा इतिहास उजागर होऊन पुन्हा डोके वर काढतो की काय, अशी भीती वाटतेय, असे मेटे म्हणाले. मागच्या सहा-सात वर्षांपूर्वी देशभर गाजलेल्या स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणाचे मूळ परळीशी जोडलेले असल्याने विनायक मेटे यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पालकमंत्र्यांनी ताबडतोब पालकत्व स्वीकारले, जबाबदारी घेतली याबद्दल पालकमंत्र्यांचे कौतुकच आहे, असेही मेटे म्हणाले. त्यांच्यासह प्रशासन, पोलिसांनी याकडे लक्ष देऊन असे दुर्दैवी प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पालकमंत्र्यांची दखल सर्व कामात असावी, असे सुचवीत त्यांनी परळीचा स्त्रीभ्रूणहत्येसंबंधी गाजलेला इतिहास पुन्हा वर येऊ नये, याची काळजीही घ्यावी, असे मेटे यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com