शेकडो गावातील नागरिकांना प्यावे लागते रासायनिक पाणी; या कंपनीला ग्रामपंचायतीकडून नोटीस

संतोष सुतार
Thursday, 27 August 2020

निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोस्ते बुद्रुक गावाजवळील जेटीएल कंपनीचे रासायनिक दूषित सांडपाणी व्यवस्थापनाकडून काळनदीत सोडले जाते. यामुळे त्या नदीवर अवलंबून असणाऱ्या निजामपूर ग्रामपंचायतीसह तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय शेकडो गावातील नागरिकांनाही हेच दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत ग्रामस्थ संतप्त झाले असून, निजामपूर ग्रामपंचायतीनेही या गंभीर प्रकरणात लक्ष घातले असून कंपनीला प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली आहे. 

माणगाव : निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोस्ते बुद्रुक गावाजवळील जेटीएल कंपनीचे रासायनिक दूषित सांडपाणी व्यवस्थापनाकडून काळनदीत सोडले जाते. यामुळे त्या नदीवर अवलंबून असणाऱ्या निजामपूर ग्रामपंचायतीसह तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय शेकडो गावातील नागरिकांनाही हेच दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत ग्रामस्थ संतप्त झाले असून, निजामपूर ग्रामपंचायतीनेही या गंभीर प्रकरणात लक्ष घातले असून कंपनीला प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली आहे. 

जीटीएल कंपनी निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू आहे. या कंपनीचे दूषित रासायनिक पाणी थेट काळ नदीच्या पात्रात सोडले जाते. त्याच नदीवर निजामपूरसह तीन गावांच्या पाणीपुरवठा योजना असल्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे निजामपूर ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ रणपिसे, पोलिस पाटील, ग्रामविकास अधिकारी पाटणे, तसेच कोस्ते बुद्रुक बौद्धवाडीतील ग्रामस्थ यांनी मंगळवारी (ता. 25) तत्काळ जीटीएल कंपनीला भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी रणपिसे यांनी कंपनीतून सोडण्यात येत असलेले दूषित पाणी तत्काळ बंद करण्याच्या लेखी व तोंडी सूचना देत कंपनीला निजामपूर ग्रामपंचायतीच्यावतीने नोटीस बजावली. तसेच जोपर्यंत कंपनी दूषित केमिकल पाण्याची विल्हेवाट आपल्या जागेत लावत नाही. तोपर्यंत हा प्लांट सुरू करू नये, असेही कंपनी व्यवस्थापनाला कळवले आहे. या संदर्भात कंपनीचे व्यवस्थापक शर्मा यांनी हा प्लांट बंद ठेवण्याचे मान्य केले असून त्यानुसार कंपनीने प्लांट बंद केला आहे. 

मोठी बातमी : भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू; पुनर्विकासाच्या वादात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच

याबाबत रायगडचे खासदार सुनील तटकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रायगड पालकमंत्री, उद्योगमंत्री अदिती तटकरे, महाड-पोलादपूर आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरी, माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर, माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे, तसेच माणगाव पोलिस उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशिद यांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

अधिक वाचा : सुशांतसिंग मृत्यू प्रकरण : रियाचे वडील व भावाची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी

सरकारने त्वरित कारवाई करावी 
काळ नदी पात्रावर माणगावसह गोरेगावपर्यंतच्या शेकडो ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना असल्याने त्याचा परिणाम तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर होणार असून, हजारो नागरिकांना या कंपनीचे रासायनिक दूषित सांडपाणी प्यावे लागत आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या निजामपूरसह शेकडो ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना साथीची रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याला जीटीएल कंपनी जबाबदार असून, या कंपनीवर सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी निजामपूर ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी केली आहे. 

हेही वाचा : मुंबई पोलिसांची दिशा कोण बदलली? सुशांतसिंह प्रकरणी नाईटलाईफ संस्कृती पुरस्कत्‍यार् नेत्यांवर गंभीर टीका

प्रदूषण मंडळ गप्प का? 
प्रदूषण मंडळाचे संबंधित अधिकारी याबाबत गप्प का आहेत? असा मार्मिक सवाल रणपिसे यांनी केला आहे. तसेच प्रदूषण मंडळाने या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. 

याप्रकरणी शहानिशा करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- जगन्नाथ साळुंखे, रायगड जिल्हा प्रदूषण नियंत्रण अधिकारी

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemical sewerage water in Kaal river at Mangao