पंचनाम्याच्या विळख्याने भरपाई मिळण्यास दिरंगाई; रायगड जिल्ह्यात 31 हजार शेतकऱ्यांना फटका

अलिबाग : पावसामुळे भातशेती अाडवी झाली आहे.
अलिबाग : पावसामुळे भातशेती अाडवी झाली आहे.

अलिबाग : जुलै ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीबरोबरच परतीच्या पावसामुळे सुमारे 10 हजार 420 हेक्टर भातपिक क्षेत्राचे नुकसान झाले. यात सुमारे 31 हजार 723 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. या नुकसानीचे काही पंचनामे तयार झाले असून काही पंचनामे सुरू आहेत. मात्र, या पंचनाम्याच्या विळख्यात शेतकरी सापडला असून, प्रत्यक्षात भरपाई मात्र मिळण्यास दिरंगाई होत आहे. 

रायगड जिल्ह्यातील शेतकरी वादळी पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक नागरिकांचा शेती हाच प्रामुख्याने व्यवसाय आहे. पावसाच्या पाण्यावरच बहुतांशी शेती केली जाते. त्यात भातपिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भातशेतीच्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतकरी चालवतात. या वर्षी सुमारे एक लाख 14 हजार हेक्‍टर क्षेत्रामध्ये भातपिकाची लागवड करण्यात आली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे पेरणीसह लावणीची कामे वेळेवर झाली. त्यामुळे भाताची रोपे चांगली वाढू लागली. परंतु, जुलै महिन्यामध्ये वादळी पावसात 0.98 हेक्‍टर भातपिकाचे नुकसान होऊन नऊ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. 

ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत 19.96 हेक्‍टर पिकाचे नुकसान होऊन 69 शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसात सुमारे 400 हेक्‍टर पिकाचे नुकसान होऊन 1 हजार 645 शेतकरी आर्थिक संकटात सापडले. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल तयार होऊन सरकारकडे पाठवण्याच्या मार्गावर प्रशासन असताना, ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडला. या पावसात बहरलेली भातशेती पाण्याखाली गेली. यामध्ये सुमारे 10 हजार हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, सुमारे 30 हजार शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नुकसानीचे पंचनामेही सुरू केले आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 31 हजार 723 शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. या फटक्‍यापासून सावरण्यासाठी त्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या माध्यमातून काही पंचनामे पूर्ण झाली असून, काही पंचनामे सुरू आहेत. या पंचनाम्यांच्या विळख्यात रायगड जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे; परंतु प्रत्यक्षात मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

आतापर्यंत झालेले नुकसान 
                        भातपिक क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)   बाधित शेतकरी 
जुलै                          0.98                        9 
ऑगस्ट                   19.96                       69 
सप्टेंबर                    400                         1,645 
ऑक्‍टोबर (अंदाजित)    30,000                   10,000  

जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारला पाठवला आहे. सप्टेंबरच्या नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाली असून, त्याचा अहवाल लवकरच पाठवला जाईल. 
- पांडुरंग शेळके, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, रायगड 

तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनामे केली जातात; पण प्रत्यक्षात भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कुटुंब चालवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी अपेक्षा आहे. 
- तुषार शेरमकर, शेतकरी  


(संपादन : उमा शिंदे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com