नवी मुंबईत गुन्हे शाखेसाठी नव्या पदाची निर्मिती; अपर पोलिस आयुक्तपदी डॉ. शेखर यांची नियुक्ती

विक्रम गायकवाड
Thursday, 1 October 2020

उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पदाची नव्याने निर्मिती करण्यात आली. या पदासाठी गृह विभागाने राज्य राखीव पोलिस बल, मुंबई येथे पोलिस उपमहानिरीक्षकपदी कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी डॉ. बी. जी. शेखर यांची नियुक्ती केली आहे.

नवी मुंबई : उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पदाची नव्याने निर्मिती करण्यात आली. या पदासाठी गृह विभागाने राज्य राखीव पोलिस बल, मुंबई येथे पोलिस उपमहानिरीक्षकपदी कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी डॉ. बी. जी. शेखर यांची नियुक्ती केली आहे. या पदाची निर्मिती करताना सरकारने पोलिस उपआयुक्त (मुख्यालय-प्रशासन) लोहमार्ग-मुंबई हे पद नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात वर्ग केले आहे. 

सरकारने केलेल्या अन्य बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांची परिमंडळ-1 चे पोलिस उपआयुक्त म्हणून, तर पोलिस उपआयुक्त (मुख्यालय) शिवराज पाटील यांची परिमंडळ-2 चे पोलिस उपआयुक्त म्हणून नव्याने नियुक्ती केली आहे. परिमंडळ-1चे पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांची बदली महाराष्ट्र राज्य पोलिस नियंत्रण कक्ष येथे पोलिस अधीक्षक म्हणून केली आहे. तर परिमंडळ-2चे पोलिस उपआयुक्त अशोक दुधे यांचीही बदली झाली असून, ते नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 

हेही वाचा : २०१९ आधीचे कॉल डिटेल्स मिळणं कठीण, NCB च्या तपासात स्पीडबेकर येण्याची शक्यता

दरम्यान, नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात गुन्हे शाखेसाठी आता नव्याने पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने आयुक्तालयाला आणखी एक आयपीएस पोलिस अधिकारी लाभला आहे. आता नवी मुंबईत गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून पोलिस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याऐवजी अपर पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी कामकाज पाहणार आहेत. 

वाचा : अनलॉकनंतर रायगड जिल्‍ह्यातील पर्यटन बहरतेय

चार सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती 
सरकारने बदल्या केलेल्या राज्यातील 105 पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी चार अधिकाऱ्यांची नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात सहायक पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये उस्मानाबाद येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलिस उपअधीक्षक सचिन सावंत, जळगावमधील भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पालघरमधील जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनावणे, अमरावती शहरचे सहायक पोलिस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांची नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यासोबतच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) राजेंद्र चव्हाण यांची मुंबई शहर येथे बदली केली आहे.  

 
(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police transfers at Navi Mumbai Police Commissionarate