नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची सुरक्षा वाऱ्यावर; सुरक्षा रक्षकांसह मेटल डिटेक्‍टरचा अभाव

सुजित गायकवाड
Wednesday, 28 October 2020

मेटल डिटेक्‍टरचा अभाव, रुग्णालयात तपासणीशिवाय प्रवेश, सुरक्षा रक्षकांची अपुरी संख्या आदी उणिवांमुळे नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची सुरक्षा रामभरोसे आहे. वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयात घुसून मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी बुधवारी (ता. 28) रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. काही कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. या पार्श्‍वभूमीवर 'टीम सकाळ'ने केलेल्या पाहणीत हे उघड झाले. त्यामुळे सेवा चांगली, पण रुग्णालयांच्या सुरक्षेचे काय, असा संतप्त सवाल रुग्ण आणि कर्मचारी उपस्थित करत आहेत. 

नवी मुंबई : मेटल डिटेक्‍टरचा अभाव, रुग्णालयात तपासणीशिवाय प्रवेश, सुरक्षा रक्षकांची अपुरी संख्या आदी उणिवांमुळे नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची सुरक्षा रामभरोसे आहे. वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयात घुसून मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी बुधवारी (ता. 28) रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. काही कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. या पार्श्‍वभूमीवर 'टीम सकाळ'ने केलेल्या पाहणीत हे उघड झाले. त्यामुळे सेवा चांगली, पण रुग्णालयांच्या सुरक्षेचे काय, असा संतप्त सवाल रुग्ण आणि कर्मचारी उपस्थित करत आहेत. 

विजय नाहटा हे आयुक्तपदी असताना खासगी रुग्णालयांनाही लाजवतील, अशा भव्य रुग्णालयाच्या इमारती महापालिकेने उभ्या केल्या; परंतु अपुरे मनुष्यबळ आणि यंत्रणेअभावी त्या इमारती सुरुवातीच्या काळात फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या होत्या. कालांतराने महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे सांभाळणाऱ्या तुकाराम मुंढे, डॉ. एन. रामास्वामी, अण्णासाहेब मिसाळ आदी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत वैद्यकीय सुविधा पुरवण्यास सुरुवात केली; परंतु अनेक कारणांमुळे ही रुग्णालये नेहमी चर्चेत राहिली आहेत. त्याची दखल घेत प्रशासनाने काही सुरक्षा सुविधा पुरवण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्ष रक्षकांचा समावेश आहे; परंतु वाढत्या रुग्णसंख्येसमोर ही सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील हल्ला प्रकणानंतर अधोरेखित झाले आहे. हल्लेखोरांच्या हातात शस्त्रे होती, असा आरोप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

मोठी बातमी : लोकल सुरू होण्याची पॉझिटिव्ह चिन्ह; सरकारच्या प्रस्तावावर मध्य रेल्वेकडून आलं उत्तर

पाहणीत विदारक वास्तव समोर 
महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय, बेलापूर, नेरूळ माताबाल रुग्णालय आणि ऐरोली सामान्य रुग्णालय ही महापालिकेची रुग्णालये आहेत; परंतु या ठिकाणी असलेली सद्यस्थितीतील सुरक्षा यंत्रणा अपुरी असल्याचे "टीम सकाळ'च्या पाहणीत दिसून आले. काही ठिकाणी रुग्णालय प्रशासनांनी या संदर्भात गांभीर्याने पाहत महापालिकेकडे सुरक्षा रक्षक वाढवण्याची मागणी केली आहे, असे समजते. 

हेही वाचा : शितल भानुशाली यांच्या मृत्यूचे गूढ वाढले; आता पुढील तपास पोलिसांकडून होणार

बेलापूर, कोपरखैरणे, नेरूळ, तुर्भे आदी रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावर कुठेही मेटल डिटेक्‍टर अथवा फ्रेम मेटल डिटेक्‍टर बसवण्यात आल्याचे निदर्शनास आले नाही. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात पूर्वी तळोजा कारागृहातील कैदी नियमित चाचणीसाठी येत होते. त्यामुळे काही कालावधीसाठी फ्रेम मेटल डिटेक्‍टर बसवण्यात आला होता. मात्र तो बंद पडल्यानंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून कुणाचीही तपासणी किंवा चौकशी करण्यात येत नाही. त्यामुळे हल्ले किंवा मोठा घातपात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

अधिक वाचा : पनवेल पालिकेवर भाजपचेच वर्चस्व; स्थायी समिती सभापतिपदी संतोष शेट्टी

वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाने तोडफोड केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच यापुढे या रुग्णालयात कायम पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी महापालिकेतर्फे नवी मुंबई पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिसांनीही ती मागणी मान्य करून बंदोबस्त देण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच इतर रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. 
- अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका 

रुग्णालयांच्या सुरक्षेचा आढावा 
रुग्णालय                          तैनात सुरक्षा रक्षक   आवश्‍यक सुरक्षा बल 
बेलापूर सामान्य रुग्णालय         9                      14 
नेरूळ माताबाल रुग्णालय       31                     41 
वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय      52                     67 
तुर्भे माताबाल रुग्णालय            4                     आढावा घेतलेला नाही 
ऐरोली सामान्य रुग्‍णालय         15                     25 
 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security of Navi Mumbai Mahanagar Corporation in bad condition