रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वणवण थांबणार; जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र अतिदक्षता विभाग

प्रमोद जाधव
Monday, 5 October 2020

कोरोनाच्या रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईमध्ये हालवावे लागत होते. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात पायपीट होत होती; परंतु ही वणवण आता थांबणार आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात वातानुकूलित व सर्व सोयीसुविधांयुक्त अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले आहे. या विभागाचा शुभारंभ पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला.

अलिबाग : कोरोनाच्या रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईमध्ये हालवावे लागत होते. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात पायपीट होत होती; परंतु ही वणवण आता थांबणार आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात वातानुकूलित व सर्व सोयीसुविधांयुक्त अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले आहे. या विभागाचा शुभारंभ पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला. 

कोरोनाची लागण झालेल्या गंभीर रुग्णांची उपचारासाठी मुंबईत रवानगी केली जात होती. त्यात काहींचा रस्त्यात रुग्णवाहिकेमध्येच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार व्हावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात बाधितांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांच्या मागणीला दुजोरा देत अद्ययावत असे कक्ष सुरू करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर कोरोना रुग्णांसाठी अद्ययावत असे अतिदक्षता विभाग सुरू केले आहे. हे विभाग 100 खाटांचे असून, सध्या 40 खाटांचे विभाग तयार करण्यात आले आहे. अन्य खाटांच्या कक्षाचे काम 15 दिवसांत पूर्ण होऊन गंभीर रुग्णांवर येथेच उपचार होणार आहेत. 

हेही वाचा : रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी उभारी मिळणार

मुंबई-पुणे येथील खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, सरकारच्या निधीसह सीएसआर फंडातून हे कक्ष सुरू केले आहे. या कक्षाचा जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना फायदा होणार आहे. हा नवा अतिदक्षता विभाग वातानुकूलित असून, या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी आठ सफाई कामगार, आठ परिचारिका, तसेच सहा इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्‍टर असणार आहेत. तसेच रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सहा किलोमीटर क्षमता असलेल्या लिक्विड ऑक्‍सिजनची टाकी उभारण्यात आले आहे. सुमारे 15 दिवस यातून ऑक्‍सिजन पुरेल, अशी सुविधा आहे. 

या वेळी पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, हेक्‍सावेअर टेक्‍नोलॉजी लि.च्या सीएसआर विभागातील अंबरीन मेमन, राहुल गायकवाड आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. 

अधिक वाचा : रायगडमध्ये अवकाळीचा भाताला फटका; शेतकरी चिंतेत

अतिदक्षता विभागाची रूपरेषा
खाटांची सुविधा... 100 
परिचारिका...
सफाई कामगार...
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्‍टर...
लिक्विड ऑक्‍सिजन टाकी... सहा किलोमीटर क्षमतेची 

आणखी वाचा : नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! एक्सपायरी डेटविना मिठाई विक्री

ज्या पद्धतीने खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होतात. त्याच धर्तीवर अलिबागमध्ये जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार व्हावे ही संकल्पना होती. ही संकल्पना प्रत्यक्षा उतरली असून, या ठिकाणी चाचण्या व अन्य उपचार रुग्णांवर वेळेवर होण्यास मदत होणार आहे. 
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड  

 

(संपादन : उमा शिंदे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Started New ICU ward in Raigad district hospital at Alibag