'या' तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटण्याची शक्‍यता; पुलाचा भाग ढासळल्याने वाहतूक बंद

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

श्रीवर्धन तालुक्‍यातील जावेळे नदीवरील जुना पूल 5 ऑगस्ट रोजी पडलेल्या जोरदार पावसाने अधिकच कमकुवत झाला आहे. या पुलाचा काही भाग सोमवारी ढासळला होता. त्याची पाहणी श्रीवर्धन पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यात पूल मध्यभागी खचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे.

अलिबाग : श्रीवर्धन तालुक्‍यातील जावेळे नदीवरील जुना पूल 5 ऑगस्ट रोजी पडलेल्या जोरदार पावसाने अधिकच कमकुवत झाला आहे. या पुलाचा काही भाग सोमवारी ढासळला होता. त्याची पाहणी श्रीवर्धन पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यात पूल मध्यभागी खचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे.

साधारणतः 40 वर्षांपूर्वी दगडी स्वरूपात बांधलेल्या पुलाच्या वरच्या बाजूस सिमेंट व लोखंडाचा वापर केलेला आहे. या पुलाच्या दुतर्फा सिमेंटचे एक फुटाचे संरक्षक कठडे बांधलेले आहेत. मात्र, पुलाचा आधार असलेल्या तीन संरक्षक भिंतींपैकी एक संरक्षक भिंत ढासळण्यास सुरुवात झाली आहे. 5 ऑगस्टच्या मुसळधार पावसामुळे हा पूल अधिकच कमकुवत झाल्याने सोमवारी याचा काही भाग ढासळला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मनोहर सावंत या व्यक्तीने श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे सोमवारी सायंकाळी कळवली होती. त्यानंतर तहसीलदारांनी तत्काळ दखल घेत हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. 

हेही वाचा : कोरोनामुळे स्वातंत्र्यदिनानिमित्त होणार्!या खरेदीवर परिणाम; बाजारपेठा सजल्या; खरेदीला मात्र आखडता हात

या पुलावरून वडशेत वावे, धारवली, आडी कोलमंडला, साखरोने, कारवीने या गावांचे दळणवळण चालते. मात्र, आजमितीस कोणतेही अवजड वाहन पुलावरून गेल्यास अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे श्रीवर्धन पोलिस दलाने पुलाच्या दोन्ही मार्गांवर पूल वाहतुकीस बंद असल्याबाबतचे मार्गरोधक लावलेले आहेत. मार्ग बंद झाल्याने या पाच गावांचा संपर्क तुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

अरे वाह... : कळंबोली पोलिस मुख्यालयात पाळणा हलला

दरम्यान, या पुलाची पाहणी पंचायत समिती सभापती बाबुराब चोरगे, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, जावेळे सरपंच व ग्रामस्थ यांनी मंगळवारी केली. या वेळी पुलाच्या बरोबर मध्यभागी काही अंशी पूल खचला असल्याचे या वेळी निदर्शनास आले. तसेच, पुलावर पावसामुळे दोन्ही बाजूला गवत उगवलेले दिसले. या पुलाच्या खालून जावेळे नदीचा प्रवाह जोरात वाहत असतो. त्यामुळे कोणतेही चारचाकी वाहन पुलावरून गेल्यास अपघाताची शक्‍यता अधिक आहे. 

वाचा सविस्तर : नवी मुंबईतल्या १० खासगी रुग्णालयांना पालिकेची नोटीस

वडशेत वावे गावातील व्यक्तीने पूल ढासळण्यास सुरुवात झाल्याची माहिती कळवल्यानंतर तत्काळ संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेला याविषयी आदेश निर्गमित केले. सद्यस्थितीत जावेळे पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. 
- सचिन गोसावी, तहसीलदार, श्रीवर्धन 

मंगळवारी सकाळी जावेळे पुलाची पाहणी केली. सद्यस्थितीत पूल वाहतुकीस धोकादायक बनलेला आहे. मात्र, गणेशोत्सव असल्याकारणाने नागरिकांची गैरसोय होऊ नये, या अनुषंगाने संबंधित बांधकाम खात्याने तत्काळ पर्यायी उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
- बाबुराव चोरगे, सभापती,
श्रीवर्धन पंचायत समिती  

(संपादन : उमा शिंदे)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transportation closed due to collapse some parts of Jawale Bridge at Shrivardhan Taluka