राज्यातील 50 विद्यार्थी फिलिपिन्समध्ये अडकले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले राज्यातील सुमारे 50 विद्यार्थी फिलिपिन्समध्ये अडकले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या देशात "लॉकडाऊन' करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर अडकलेल्या या विद्यार्थ्यांना अद्याप केंद्र सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत. 

मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले राज्यातील सुमारे 50 विद्यार्थी फिलिपिन्समध्ये अडकले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या देशात "लॉकडाऊन' करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद केली आहे. या पार्श्‍वभूमीवर फिलिपिन्समध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप केंद्र सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत. 

ही बातमी वाचली का? दक्षिण मुंबईतील दहावीचा विद्यार्थी कोरोनाग्रस्त

फिलिपिन्समधील कोरोनाबाधितांची संख्या साडेचारशेच्या पुढे गेली असून, 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथे 12 एप्रिलपर्यंत "लॉकडाऊन' करण्यात आले आहे. या संकटामुळे अडकलेल्या या विद्यार्थ्यांना खोलीतच राहण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अत्यावश्‍यक गरजेच्या वस्तू आणण्यासाठी एका खोलीतील एकाच विद्यार्थ्यांला पास देऊन बाहेर पडण्याची परवानगी दिली जाते. पास नसलेल्या व्यक्तीकडून दंड आकारला जात आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त ऑन फिल्ड

कोरोनाच्या भीतीमुळे फिलिपिन्समधून आम्हाला मायदेशी नेण्याची व्यवस्था करावी, अशा विनंतीचे ई-मेल या भारतीय विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला पाठवल्याचे समजते. भारतीय दूतावासाला विनंती करूनही मदत मिळत नसल्याची तक्रार हे विद्यार्थी करत आहेत. त्यापैकी काही विद्यार्थ्यांचा व्हिसा संपला असून, ब्युरो ऑफ इमिग्रेशन बंद असल्याने नूतनीकरणाचा पेच निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना व्हिसा नूतनीकरणासाठी ई-मेलवरून व्हिसाचे छायाचित्र आणि पारपत्र क्रमांक पाठवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे कागदपत्रे पाठवल्यानंतरही केंद्र सरकारकडून मदत होत नसल्याचे हे विद्यार्थी सांगत आहेत. 

घरच्यांनी आमची काळजी करू नये. आम्ही सर्व विद्यार्थी आपापल्या खोल्यांमध्येच राहत आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आम्हाला फिलिपिन्समधून भारतात येण्यासाठी मदत करावी. 
- राहुल सराफी, वैद्यकीय विद्यार्थी, फिलिपिन्स .
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 students from Maharashtra stranded in the Philippines