ल्युकेमिया असतानाही 'तिने' केली कोरोनावर यशस्वी मात; 9 वर्षाच्या चिमुरडीची कहाणी... 

cancer and corona
cancer and corona

मुंबई : नाहूर येथील रहिवासी असेलली 9 वर्षांची अंजली (बदललेले नाव) लॉकडाऊनमध्ये शाळेला अचानक सुट्टी मिळाल्याच्या आनंदात असतानाच तिला दोनदा ताप येऊन गेला. औषधांनी ताप उतरला खरा; पण काही दिवसांनंतर तिचे गुडघे सुजत असल्याचे आणि ती लंगडू लागल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. लॉकडाऊन सुरू व्हायच्या काही दिवस आधीच हे घडले होते. त्यामुळे तिच्या पालकांनी मोठ्या धावपळीत जवळपासच्या डॉक्टरांची शोधाशोध सुरू केली. तिला स्थानिक ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे नेण्यात आले आणि तिथे तिच्या पायांचा एक्स-रे केला. एक्स-रेच्या रिपोर्टमध्ये कोणताही दोष सापडला नाही. 

डॉक्टरांनी औषधे दिली, मात्र, औषधे घेऊनही तिच्या पाठ आणि पायाचं दुखणं कायम होतं आणि गुडघ्यांवरची सूजही उतरली नाही. जवळपास 8 दिवसांनंतर, तिच्या पालकांनी तिला पुन्हा एकदा डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांना मुलीला आर्थ्रायटिसचे असेल असा संशय आला. त्यांनी त्यानुसार तिचे उपचार सुरू केले पण, तिला फरक पडत नव्हता. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मुंबईतील एका रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. 

7 मे रोजी अंजलीला लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्या अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. 8 मे रोजी बोन मॅरोची एक चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निष्कर्ष हाती आल्यावर डॉक्टरांनी अंजलीला ल्युकेमिया असल्याचे  पालकांना सांगितले. तिथेच अंजलीला दोन केमोथेरपी देण्यात आल्या. पोलिस कर्मचारी असलेल्या अंजलीच्या वडिलांना घर आणि रुग्णालय दोन्ही गोष्टी सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत होऊ लागल्याने त्यांनी अंजलीला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

धारावीचं कौतुक आहेच, परंतु दादरमधील अनियंत्रित रुग्णवाढ जास्त चिंताजनक

या सर्व परिस्थितीत अंजलीचे चालणे पूर्णपणे बंद झाले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची कोरोना चाचणी केली गेली आणि तिचे रिपोर्टस् निगेटिव्ह आल्यानंतर तिला कॅन्सर केअर विंगमध्ये हलवण्यात आले आणि तिच्यावरील उपचार सुरू झाले. मात्र केमोच्या पुढच्या उपचारासाठी 13 जूनला बाप-लेक पुन्हा फोर्टिस रुग्णालयात गेले, तेव्हा मुलीची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हा तिला हायब्रिड कोव्हिड-19 विभागात हलवले. तिच्यावर कोविड-19 आणि ल्युकेमिया अशा दोन्ही आजारांवरील उपचार एकाच वेळी सुरू करण्यात आले. तिला एका विलगीकरण कक्षामध्ये ठेवणे आवश्यक होते. 

मात्र अंजली वडिलांशिवाय राहायला तयार नव्हती. वडिलांना संसर्ग होऊ शकतो या भीतीने संरक्षकात्मक सर्व सुविधा पुरवल्या गेल्या. तरीही 19 जून रोजी अंजलीचे वडील राजेश घुगे यांचीही कोव्हिड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांना उपचारांसाठी आपल्या मुलीच्या शेजारीच दाखल केले. त्यानंतर दोघांवरही उपचार करुन 29 जून रोजी त्या दोघांनाही डिस्चार्ज दिला गेला. 6 जुलै रोजीला पुन्हा एकदा मुलीची कोविड-19 चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटीव्ह आली तेव्हा पोलिस कर्मचारी घुगे यांचा जीव भांड्यात पडला.अंजलीच्या चिंताग्रस्त वडिलांना या काळात त्यांचे सहकारी पोलिस मित्रांनी फार सहकार्य केले. शिवाय, अंजलीच्या उपचारासाठी महाराष्ट्र पोलिस कुटुंब योजनेतून पूर्णपणे आर्थिक सहाय्य केले गेले.

बाप-लेकीने कोरोनावर यशस्वी मात केली होती. मुलीला एकाच ठिकाणी कोव्हिड-19 आणि ल्युकेमिया या दोन्हींवरचे उपचार पुरवता आले. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व वयोगटांतील रुग्णांना आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी सर्वंकष उपचारांची ही देणारी हायब्रिड हॉस्पिटल व्यवस्था ही काळाची गरज बनली आहे. ल्युकेमियाग्रस्त व बोन मॅरो प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. 
-डॉ. शुभप्रकाश सन्याल, कन्सल्टन्ट हिमॅटोलॉजिस्ट आणि हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, फोर्टिस रुग्णालय.

---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com