मुंबईत कोरोनापाठोपाठ आणखी एका आजाराचे थैमान; दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद

भाग्यश्री भुवड
Tuesday, 18 August 2020

कोरोनावर काम करत असल्यामुळे पावसाळी आजारांबाबत थोडं दुर्लक्ष झाले आहे. मात्र, आता हळूहळू त्यावर काम केले जात आहे.

मुंबई, 18 : महापालिका आणि आरोग्य प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनतर मुंबईवरील कोरोनाचे संकट आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. कोरोना नियंत्रणात येत असल्याने मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. गेले चार-पाच महिने कोरोनामुळे निर्बंधातच अडकून पडलेले मुंबईकर आता कामावरही जायला लागले आहे. मात्र, कोरोनाचे हे संकट कमी होत नाही तोच मुंबईत आणखी एका आजाराची साथ पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आजारामुळे ऑगस्टमध्ये दोन जणांचा मृत्यूही झालाय.

WHO नेही व्यक्त केली भीती, कोरोना संसर्गाचा दंत डॉक्टरांना सर्वाधिक धोका

कोरोनाच्या संकटानंतर आता मुंबईत मलेरियाची साथ पसरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत मलेरियाचे अधिक रूग्ण सापडले आहे. मुंबईत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 824 मलेरियाचे रूग्ण सापडले होते. यंदा ही 592 रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. यात दोन रूग्णांना कोरोनाचीही लागण झाली होती, असेही सांगण्यात आले आहे. जुलैमध्ये मलेरियाचा आकडा दुप्पटीने वाढला होता. मात्र, गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. 

अत्यंत महत्त्वाचं : यंदा थेट विसर्जनासाठी जाता येणार नाही, विसर्जनासाठीची नियमावली वाचून घ्या

मुंबईत मलेरियापाठोपाठ डेंग्यू, लेप्टोचेही रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 49 रुग्ण आढळले होते, आता ही संख्या 16 वर आहे. तर, डेंग्यूचे 6 रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जी उत्तर या विभागात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाला 30 जुलै या दिवशी ताप आणि उलट्या व्हायला सुरूवात झाली. 2 ऑगस्ट या दिवशी त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, 3 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला. त्याला मलेरियासोबत कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्याचे अवयव निकामी झाले होते. 

सिडकोचे उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची बदली; कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाल्याने तर्कवितर्कांना उधाण

तसेच एका 40 वर्षीय पुरुषाला 29 जुलैला नवी मुंबईच्या एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. ताप, सर्दी अशी लक्षणे असल्याने त्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांना मलेरिया झाल्याचेही समोर आले. त्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास, ताप, सर्दी, छातीत दुखणे अशा समस्या जाणवू लागल्या. अखेर त्याचा 4 ऑगस्टला मृत्यू झाला. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईत मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याचं म्हटलं आहे.

ठाणे मनपा आयुक्तांना अल्टिमेटम, पुढील चार दिवसात खड्डे बुजवा नाहीतर...

कोरोनावर काम करत असल्यामुळे पावसाळी आजारांबाबत थोडं दुर्लक्ष झाले आहे. मात्र, आता हळूहळू त्यावर काम केले जात आहे. आता पालिकेकडून मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्या निर्माण होऊ नयेत म्हणून झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्ये फवारणी केली जात आहे. बांधकांमांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना फवारणी करण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी फवारणी होत नाही, परिणामी मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्या निर्माण होतात, असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. 
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after corona, there is spread of new disease in mumbai two patients passed away