esakal | खासदार विचारेंकडून 'या' प्रकल्पाची पाहणी; नवी मुंबईकर सुसाट...
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार विचारेंकडून 'या' प्रकल्पाची पाहणी; नवी मुंबईकर सुसाट...

नवी मुंबईतील जलद वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऐरोली ते कटाई नाका रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या मार्गामुळे प्रवाशांना ऐरोली ते कटाई नाक्‍यापर्यंतचा प्रवास फक्त 10 मिनिटांत होणार आहे.

खासदार विचारेंकडून 'या' प्रकल्पाची पाहणी; नवी मुंबईकर सुसाट...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईतील जलद वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऐरोली ते कटाई नाका रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या मार्गामुळे प्रवाशांना ऐरोली ते कटाई नाक्‍यापर्यंतचा प्रवास फक्त 10 मिनिटांत होणार आहे. त्यामुळे 21 मे 2018 रोजी या मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. हा मार्ग लवकर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावा, मार्गाचे काम जलद गतीने मार्गी लागावे, यासाठी खासदार राजन विचारे यांनी शुक्रवारी (ता.24) एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसमवेत, या मार्गाच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. 

ही बातमी वाचली का? खालापूरात चार फुटी मांडुळ

नवी मुंबई शहर नव्याने विकसित होत आहे. दिवसेंदिवस येथील लोकसंख्येत मोठी वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, विविध प्रकल्प यामुळे लागून असलेली मुंबई व कल्याण, बदलापूर यासह इतर शहरे नवी मुंबईशी जोडली जाणार आहे. त्यामुळे कालांतराने या ठिकाणी वाहतूक कोंडी व रस्ते, नवे मार्ग तयार करणे ही काळाची गरज आहे. यासाठी एमएमआरडीएने ऐरोली ते कटाई नाका रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या मार्गाच्या कामाला 2016 मध्ये मान्यता मिळाली. ऐरोली ते कटाई नाका हा प्रकल्प 12.3 किलोमीटरचा आहे. यातील पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-4 पर्यंतचे 2.71 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे असणार असून, यामध्ये तीन-तीन लेनच्या मार्गिका असणार आहे. 1 लेन अधिक ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 237. 56 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ही बातमी वाचली का? कांद्याचे दर आजही चढेच, ही आहे कारणे...

दुसऱ्या टप्प्यात ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर मार्गापर्यंत 2.30 किलोमीटरचा एलिव्हेटेड 3+3 लेनचा असणार असून, या प्रकल्पाची किंमत 275 कोटी आहे. दोन्ही टप्प्याचे काम सप्टेंबर 2019 पर्यंत करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पाहणीत हे काम 30 टक्केच पूर्ण झाल्याचे दिसून आले. या पाहणी दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, नगरसेवक एम. के. मढवी, संजू वाडे, ममित चौगुले, आकाश मढवी, करण मढवी, किशोर पाटकर, तसेच एमएमआरडीचे अधीक्षक अभियंता प्रकाश भांगरे, कार्यकारी अभियंता मिलिंद जैतपाल, उपअभियंता कौशल मारू; तसेच वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बी. एन. औटी; तसेच इतर ठेकेदार उपस्थित होते. 

ही बातमी वाचली का? या कारणामुळे पतीने केले पत्नीवर सपासप वार..

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ते कटाई नाका या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन ठाणे महापालिकेमार्फत करण्यात येईल. त्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागेल. 
- राजन विचारे, खासदार. 

दृष्टिक्षेप 
प्रकल्प लांबी - 12.3 किलोमीटर 
पहिल्या टप्प्या - ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-4 
लांबी - 2.71 किलोमीटर 
खर्च - 237.56 कोटी रुपये 
दुसरा टप्पा - ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर मार्ग 
लांबी - 2.30 किलो मीटर 
खर्च- 275 कोटी रुपये