औषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...

औषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...

ठाणे : कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही लस तयार झालेली नाही. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हाच एकमेव उपाय असल्याचे समोर आले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानेही अनेक वनौषधींपासून तयार केलेल्या काढ्याचा नियमीत वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आयुर्वेदीक काढ्याचे सेवन नागरिक करु लागल्याने औषधी वनस्पतींचे महत्त्वही वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत हजारो नागरिकांनी नर्सरी विक्रेत्यांकडे याविषयी विचारणा करुन त्यांच्याकडून औषधी वनस्पतींच्या बिया व रोपांची मागणी वाढली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधी काढ्याचा उपयोग घरोघरी केला जात आहे. त्यामुळे घरच्या गच्चीतील बागेत गवती चहा, कृष्ण तुळस, गुळवेल, पानवेल या औषधी वनस्पतींचा बहर आला आहे. विविध रोपवाटिकांमध्ये सध्या फुल झाडांऐवजी औषधी वनस्पतींना मागणी वाढल्याचे नर्सरी चालकांचे म्हणणे आहे. 

मागणी असलेल्या रोपांमध्ये गवतीचहा, कृष्ण कापूर तुळस, ओवा, गुळवेल, पानवेल, गोकर्णवेल, अडुळसा, अश्वगंधा, गुडूची यांचा समावेश असून या रोपांना घराच्या बाल्कनीत, गच्चीत, सोसायटीच्या आवारात बहर आला आहे. गुगलवरही या औषधी वनस्पतींची, त्यासंबंधी नर्सरीची आणि लागवडीची माहिती नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सर्च करुन या वृक्षांची लागवड केली आहे. घरी, सोसायटीत तयार होणाऱ्या सेंद्रीय खतांच्या सहाय्याने ही रोपे वाढविण्यार भर दिला जात आहे. त्यामुळे त्यातील औषधी गुण टिकून राहात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 
कोरोनाकाळात आरोग्यविषयक जागृती वाढली असून औषधी वनस्पतींचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले फायदेही नागरिकांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे फुलझाडांसोबतच औषधी वनस्पतींचीही लागवड करुन त्यांचा नियमीत वापर करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे या दोन महिन्यात निदर्शनास येत असल्याचे नर्सरी चालक सांगतात. नागरिकांमध्ये औषधी वनस्पतींविषयी जागृती वाढत असल्याने नर्सली केंद्र चालकांनीही औषधी वनस्पतींचा पुरवठा वाढीवर भर दिला आहे. 

बाल्कनीतील शेतीला प्राधान्य
लॉकडाऊन काळात मिळालेला मोकळा वेळ तसेच भाजीपाल्याचा तुटवडा लक्षात घेता अनेकांनी गच्ची, बाल्कनीतील शेतीला प्राधान्य दिले आहे. दुधीभोपळा, कारली, कांद्याची पात, कोथींबिर, मेथी, रताळे अशा काही भाज्या आणि कंदमुळांची लागवड नागरिकांनी घरोघरी केली असल्याचे दिसून येते. अनेक रोपवाटिका केंद्रचालकांनी समाजमाध्यमावरुन रोपांची लागवड कशी करावी, सेंद्रीय खतांची निर्मिती कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार नागरिकांनी शहरशेतीला प्राधान्य देत स्वतःचा व घरातील बालकांचाही मोकळा वेळ सार्थकी लावला आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी गुळवेलचे सेवन केले जाते. गवतीचहाच्या पानांचा उपयोग चहा, काढ्यामध्ये केला जाऊ लागला आहे. 


या दोन महिन्यात गवतीचहा, गुळवेल, पानवेल, तुळस यांसारख्या औषधी वनस्पतींना मागणी वाढली आहे. नागरिकांकडून ऑनलाईन बुकींग केले जात असून त्यांना त्यापद्धतीने रोप किंवा बियांचा पुरवठा केला जात आहे. कोरोना संक्रमण काळात औषधी वनस्पतींकडे नागरिकांचा कल वाढला आहे. रोपांचे वाटप करण्यासोबत लागवड तसेच काय काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन नागरिकांना केले जात आहे. 
- प्रसाद पाठारे, पाठारे नर्सरी

गुळवेल, तमालपत्र, कोरफड, ऑलस्पायसेस, काळी तुळस, राम तुळस, काळी हळद, आंबे हळद, हळदीची पाने यांची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर पालेभाज्या जसे की पालक, मेथी, कोथिंबीर, माठ यांच्या बियांचीही मागणी वाढली आहे. या दोन महिन्यात निश्चितच दुपटीने मागणी वाढली आहे. परंतु लॉकडाऊन आणि काही नियमांमुळे सर्वापर्यंत पोहोचणे आम्हालाही शक्य होत नाही आहे. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी पंधरा ते वीस हजारांचा व्यवसाय नर्सरीतून होत होता. तोच आता चाळीसच्या आसपास गेला आहे. 
- राजन शेगावकर, राजन नर्सरी

तुळस या औषधी वनस्पतीला बाराही महिने मागणी असते. गेल्या दोन महिन्यात गुळवेल आणि गवती चहाची मागणी वाढली आहे. लॉकडाऊनपूर्वी महिन्याकाठी पंधरा ते वीस ग्राहक याची खरेदी करत असत. ही संख्या आता दुप्पट झाले आहे. औषधी वनस्पतींचा विचार करता महिन्याकाठी पूर्वी हजार ते बाराशेचा व्यवसाय व्हायचा. आता या दोन महिन्यांत साधारण तीन ते चार हजारचा व्यवसाय या वनस्पतींमध्ये आमचा झाला आहे. 
- कृष्णा शिंदे, श्री स्वामी समर्थ नर्सरी

----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com