'डीसीजीआय'च्या कठोर नियमावलीमुळे प्लाझ्मा दानाला अत्यल्प प्रतिसाद; जाणून घ्या नियमावली...

plazma therapy
plazma therapy

मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्लाझा थेरेपीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) काही नियमावली जाहीर केले आहे. मात्र, या कठोर नियमावलीमुळे प्लाझ्मा दानाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. शिवाय, कोरोनामुक्त झालेले रुग्ण कोरोनाच्या भीतीने पुन्हा रुग्णालयात जाण्यास घाबरतात. त्यामुळे प्लाझा दान करण्यासाठी पुरेसा प्रतिसाद मिळत नाही आणि रुग्णांना त्याचा लाभ घेता येत नाही. दरम्यान, टायटर चाचणी केलेला प्लाझ्मा रुग्णांना द्यावा असाही नियम डीसीजीआयने बंधनकारक केला आहे. 

मात्र ही चाचणी भारतात उपलब्ध नाही, तरीही भारतातील काही ठिकाणी अशा प्रकारे प्लाझ्मा रुग्णांना देण्यात आला आहे. ज्यामुळे प्लाझ्मा थेरेपीबाबतचे दर सरकारने निश्चित करावे, अशी मागणी तज्ज्ञ डॉक्टरांनी केली आहे. दर निश्चित न झाल्यास प्लाझ्मा थेरेपीसाठी रुग्णांकडून कितीही रक्कम आकारली जाऊ शकते, अशी ही भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर क्लिनिकल ट्रायल म्हणून प्लाझ्मा गोळा करुन तो रुग्णांना दिला जातो आहे. मुंबईतील 10 रक्तपेढ्यांना प्लाझ्मा गोळा करुन रुग्णांना द्यायची परवानगी आयसीएमआरने दिली आहे. मात्र, डीसीजीआयच्या नियमांमुळे हे त्यांना शक्य होत नाही. डीसीजीआयच्या नियमानुसार प्लाझ्मातील अँटीबॉडीजच्या गुणवत्तेचे प्रमाण 1 : 640 इतके असले पाहिजे. मात्र, ही गुणवत्ता ठरवणारी चाचणीच भारतात उपलब्ध नाही आणि त्यामुळे रुग्णांना अतिशय नित्कृष्ट दर्जाचा प्लाझ्मा दिला जाऊ शकतो. त्यामुळे, डीसीजीआयच्या या नियमावलीत बदल करावेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, नवी दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही केंद्रीय रक्तपेढी तयार करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. 

कोरोनामुक्त झालेल्या एका 35 वर्षीय डॉक्टरला प्लाझ्मा दान करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांना दोन वेळा रुग्णालयात यावे लागेल असं रुग्णालयातून सांगण्यात आले. एकदा रक्ताची तपासणी आणि दुसऱ्या वेळी प्लाझ्मा दान करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. पण, पुन्हा कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात जाण्यासाठी कुटुंबियांनी नकार दिला. या संपूर्ण प्रक्रियेसाठी रुग्णांना रुग्णालयात दोनदा जावे लागत आहे. त्यामुळे लोक घाबरुन प्लाझ्मा दान करण्याला तयार होत नाहीत. नालासोपारा येथील एका रक्तपेढीने प्लाझ्मा थेरेपीचे दर निश्चित केले आहेत. ज्यात सरकारी रुग्णालयातील रुग्णाला जर प्लाझ्मा हवा असेल तर 15000 रुपये मोजावे लागतील आणि खासगी रुग्णालयातून जर मागणी झाली तर 20,000 रुपये मोजावे लागतील. मात्र, राष्ट्रीय रक्त संक्रमण प्राधिकरणाचे प्रमुख डॉ. सुनिल शाह म्हणतात की, रक्तातील प्लेटलेट्स मोजण्यासाठी जेवढी किंमत घेतली जाते, तेवढीच किंमत म्हणजेच 11000 रुपये यासाठी घ्यावेत असा सल्ला दिला आहे. 

वरिष्ठ रक्तसंक्रमण तज्ज्ञांच्या मते, डीसीजीआयच्या नियमानुसार, टायटर चाचणी केल्याशिवाय प्लाझ्मा रुग्णांना देता येणार नाही. पण, ही चाचणी भारतात उपलब्ध नसल्याने डीसीजीआयने हा नियम बदलला पाहिजे किंवा दुसरा पर्याय दिला आहे. प्लाझा थेरेपी ही आयसीएमआरची क्लिनिकल ट्रायल आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याचा सध्या वापर केला जात आहे. त्याचे आपल्याला गुण माहिती नाहीत. त्यामुळे, आयसीएमआरच्या ट्रायलमध्ये टायटर चाचणी केली नाही तरी चालतो. पालिकेच्या आणि काही खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. पण, फक्त हे रुग्णालये यादीत असणाऱ्या रुग्णालयांनाच प्लाझ्मा देऊ शकतात. शिवाय, या थेरेपीबाबतचे दर निश्चित करणे आवश्यक आहे जेणेकरुन याचे बाजारीकरण थांबेल.

प्लाझा थेरेपीबाबतचे दर निश्चित करणे आवश्यक आहेच. पण, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेकडून अजून कोणत्याही प्रकारची दर निश्चिती झालेली नाही. त्यामुळे, जेव्हा अधिकृत नियमावली एनबीटीसीकडून तेव्हा राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना तशाच पद्धतीचे दर बंधनकारक असतील. 
- डॉ. अरुण थोरात, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com