खबरदार! रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या बनावट इंजेक्शनची बाजारात विक्री एफडीएची कारवाई

ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे
FDA
FDAsakal

मुंबई : कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. या चिंतेदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणाऱ्या खऱ्या इंजेक्शनच्या नावाखाली बनावट इंजेक्शन बाजारात बिनदिक्कतपणे विकले जात आहेत. पंजाबमधून हे बनावट इंजेक्शन्स मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आयात केले जात आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मुंबईच्या गुप्तचर विभागाने जळगावात केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला आहे. एफडीए आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.

  कोरोना विषाणूचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. नवीन प्रकार समोर येत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांना कोरोना संसर्गाचा जास्त फटका बसत आहे. अशा स्थितीत याचा फायदा घेत काही लोक सर्रास फसवणूक करत आहेत. अशीच आणखी एक फसवणूक समोर आली आहे. शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लोबुसल इंजेक्शनच्या नावाखाली बनावट इंजेक्शन विकल्याची घटना समोर आली आहे. या इंजेक्शनचा निर्माता मेसर्स इंटास फार्मास्युटिकलच्या तक्रारीवरून एफडीएच्या इंटेलिजन्स डिव्हिजन युनिटने या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. एफडीएचे आयुक्त परिमल सिंग यांच्या मार्गदर्शनानुसार जळगावात ही कारवाई करण्यात आली आहे. चाळीसगाव, जळगाव येथे एफडीएच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घाटे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मेसर्स जोगेश्वरी फार्मावर छापा टाकला. या छाप्यामध्ये बनावट इंजेक्शनच्या 220 शिश्यासह इतर औषधी जप्त करण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान ही सर्व इंजेक्शन चंदीगड येथून आयात केल्याचे निष्पन्न झाले. जोगेश्वरी फार्मा ही इंजेक्शन्स मेसर्स डेराबस्सी, पंजाब येथून घेत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

FDA
मोठी बातमी - मुंबईतील तब्बल ५३४३ नागरिकांची नावं High Risk Contact यादीत- राजेश टोपे

हेच बनावट इंजेक्शन श्रीक्रीधा इंटरनॅशनल हेल्थकेअरलाही बिलाविना विकले गेले. एफडीएचे आयुक्त परिमल सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ही सर्व इंजेक्शन्स कोणत्याही बिलांशिवाय मोठ्या प्रमाणात पुरवली जात होती. जळगावात आयात केल्यानंतर हे बनावट इंजेक्शन मुंबईसह महाराष्ट्रात आणि इतर राज्यात बिलाविना पुरवले जात होते. ज्या औषध विक्रेत्यांकडे औषध विक्रीचा परवाना नाही, त्यांनाच हे इंजेक्शन दिले जात होते. या प्रकरणी एफडीएने जोगेश्वरी फार्माचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके आणि श्रीक्रीधा इंटरनॅशनल हेल्थकेअरचे मालक सुनील ढाल यांच्याविरुद्ध चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बनावट इंजेक्‍शन विकणाऱ्या या आंतरराज्य टोळीत कोण-कोण सामील आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.

इंजेक्शनचा वापर

ग्लोबुसल सोल्यूशन चा वापर शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीला बळकट करण्यासाठी केला जातो, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते. हे निरोगी मानवी रक्तापासून बनवले जाते ज्यामध्ये विशिष्ट रक्त पदार्थ (अँटीबॉडीज) उच्च पातळीऔ असतात, जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com