भातखळकर यांची पंतप्रधानांकडे मागणी, मुंबई पोलिस आयुक्तांना बडतर्फ करा

कृष्ण जोशी
Thursday, 27 August 2020

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील एक संशयित अभिनेत्री आणि मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी हे सतत संपर्कात असल्याचे आढळून आले आहे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील एक संशयित अभिनेत्री आणि मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी हे सतत संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. अशा स्थितीत मुंबईचे पोलिस आयुक्त परमविरसिंह आणि त्या विभागाचे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना बडतर्फ करावे या मागणीसाठी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

भातखळकर यांनी या पत्राची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पाठवली आहे. पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे आपल्या पदाचा गैरवापर करून याप्रकरणात कोणालातरी क्लिनचीट देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असाही आरोप भातखळकर यांनी केला आहे.

मोठी बातमी : मुंबई पोलिसांची 'दिशा' कोणी बदलली? सुशांतसिंह प्रकरणी नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्या नेत्यावर गंभीर टीका

सर्वोच्च न्यायालयाने जरी या तपास प्रकरणात मुंबई पोलिसांवर कोणताही ठपका ठेवला नसला तरी तसे म्हणणे ही स्वतःची फसवणूक ठरेल. कारण वरिष्ठ पोलिसांनी पत्रकारांना मुलाखती देऊन सुशांत सिंह यांचे वैद्यकीय रेकॉर्ड जाहीर करणे ही असंवेदनशीलता आहे. तसेच तपास सुरू असताना पत्रकार आणि पोलिस यांच्यात संवाद होण्यावर न्यायालयाने लादलेल्या बंधनाचे देखील उल्लंघन करण्यात आले आहे, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.

या प्रकरणातील एका संशयित अभिनेत्रीचे मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी संभाषण झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या पाटणा पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले, यातून हेच दिसून येते की परमविरसिंह स्वतःच्या पदाचा गैरवापर करून कोणालातरी निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असाही दावा भातखळकर यांनी केला आहे.

मोठी बातमी : मध्य रेल्वेकडून मुंबईतील लोकल सुरु करण्याबाबत आली महत्त्वाची बातमी

अशा स्थितीत आयुक्त परमबीर सिंह आणि उपायुक्त त्रिमुखे सेवेत राहिले तर या प्रकरणातील साक्षीदारांच्या मनात भीती उत्पन्न होईल. त्यामुळे  कायद्याचे राज्य राहिले पाहिजे आणि कोणीही अदृश्य शक्ती न्यायदानात ढवळाढवळ करू शकत नाही असा स्पष्ट संदेश पोलिसांना जाण्यासाठी या दोघांनाही बडतर्फ केले पाहिजे असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

Bhatkhalkar demand to the prime minister dismiss the mumbai police commissioner


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhatkhalkar demand to the prime minister dismiss the mumbai police commissioner