भाकरी महागली; बाजरी, ज्वारी, तांदळाच्या दरात मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात अनुक्रमे आठ, 10 आणि सहा रुपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून गरिबांची भाकरी महागली आहे. 

नवी मुंबई : यंदा उत्पादन कमी झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात वाशीतील घाऊक बाजारात ज्वारीचा दर 21 ते 39 रुपये किलो होता. तो सध्या 29 ते 45 रुपये किलो झाला आहे. गतवर्षी बाजरीला 18 ते 25 रुपये किलो दर मिळत होता. सध्या बाजरीला 30 ते 35 रुपये दर मिळत आहे; तर मागील वर्षी तांदळाला 30 ते 42 रुपये किलो दर मिळत होता, तो सध्या 30 ते 48 रुपये किलोवर पोहोचला आहे. अर्थात, मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात अनुक्रमे आठ, 10 आणि सहा रुपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून गरिबांची भाकरी महागली आहे. 

ही बातमी वाचली का? चीनहून परतली, अन् 'कोरोना' घेऊन आली! 

धान्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ज्वारी, बाजरी, तांदळाचे दर वाढल्याने गरिबांच्या भाकरीच्या किमतीतही चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. या वर्षी राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा फटका ज्वारी-बाजरीसारख्या पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. पाण्याअभावी ही पिके घेणे आता शक्‍य होत नाही. दोन वर्षांपूर्वी नेमाने पेरली जाणारी ज्वारी आता केवळ पीक राहावे या उद्देशाने लागवड केली जात आहे. बाजरीच्या तुलनेत ज्वारीला पाणी अधिक लागते. प्रामुख्याने सोलापूरमध्ये तर काही प्रमाणात लातूर, विदर्भामध्ये ज्वारी-बाजरी घेतली जाते. विदर्भामध्ये ज्वारीचे पीक घेतले जात होते; मात्र तिथे रानडुकरांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळले असून, केवळ जनावरांना चारा उपलब्ध होईल, घरची धान्याची गरज पूर्ण होईल, इतकीच ज्वारी शेतकरी पिकवत आहे. नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने बाजारात धान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

ही बातमी वाचली का? रेल्वे क्रॉसिंगच्या कसरतीला ब्रेक!

तांदूळ महागला 
तांदळाच्या किमतीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत आठ रुपयांची वाढ झाली आहे. तांदळाचे उत्पादन हे बिहार, हरयाना, यूपी, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणात होते; मात्र डिझलेचे भाव वाढल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने दरात वाढ झाली आहे, असे व्यापारी धर्मेश मिश्रा यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? मुली आणि महिलांना आकर्षित करतात हे गेम्स...

गव्हाला झळ नाही 
दुष्काळाचा फटका गव्हाला फारसा बसलेला नाही. उत्तर भारतीय राज्यांमधून गहू आयात होत असल्यामुळे उत्पन्न आणि मागणी यांचा मेळ अद्याप विस्कळित झालेला नाही. गव्हाच्या दरामध्ये दोन ते तीन रुपयांची वाढ झाली असली, त्याचा फारसा फरक जाणवत नाही. गव्हाचा दर हा मागील वर्षी 25 ते 29 रुपये किलो होता. जो सध्या 27 ते 31 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. 

ही बातमी वाचली का? एसटीने जाणले प्रवाशांचे मोल

स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा आग्रह धरला जातो. त्यामुळे शहरात ज्वारीची मागणी दुपटीने वाढली आहे. अधिक पैसे देऊन राज्यातून ज्या ठिकाणांहून ज्वारी येत होती, तिथून ती पुरेशी उपलब्ध होत नाही. मुंबईइतकीच गुजरातमध्येही ज्वारीला वाढती मागणी आहे. मुंबईपेक्षा या ठिकाणी ज्वारीला मिळणारा दर अधिक असल्याने उत्पादकांचा त्या ठिकाणी माल पाठवण्याकडे असणारा कल अधिक आहे. 
- एस. एन. हिरालाल, घाऊक व्यापारी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big increase in prices of pearl millet, sorghum and rice