मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या फर्निचरला भ्रष्टाचाराची वाळवी, भाजपचा दावा...

कृष्ण जोशी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

"आपल्याच दालनातील कपाट देखील धडधाकट बनवू न शकणारे सत्ताधारी मुंबईकरांना चांगल्या दर्जाचा सोयीसुविधा देऊ शकतील का?"- खणकार 

मुंबई - मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या शिवसेना कार्यालयातील फर्निचरलाच भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी केला आहे. त्याच्या समर्थनार्थ या वाळवी लागलेल्या फर्निचरची शुक्रवारी काढलेली छायाचित्रेही त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. 

गेली अनेक वर्षे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून त्यांच्या कारभारावर किंवा महापालिकेतील भ्रष्टाचारावर पालिकेच्या सभागृहात नेहमीच चर्चा होते. मात्र एरवी शहरातील कामात होणारा हा भ्रष्टाचार आता कुठवर पोहोचला आहे याचं उदाहरणच या छायाचित्रातून दिसतंय, असं खणकर यांनी सांगितले आहे.

मोठी बातमी - 'बॉर्डरचा राजा' जम्मू-काश्‍मीरला रवाना होणार; कोरोनामुळे प्रवासात अडथळे!

महापालिकेत तळमजल्यावर राजकीय पक्षांना कार्यालये देण्यात आली असून तेथे खुर्च्या, कपाटे, टेबल आदी फर्निचरही पालिकेतर्फे ठेवण्यात आले आहे. याचा खर्च लाखो रुपयांच्या घरात असतो. यापैकी शिवसेना कार्यालयात बसवलेले फर्निचर वर्षभरात खराब झाले असून त्याला वाळवी लागली आहे, असा दावा खणकर यांनी केला असून त्याची छायाचित्रेही त्यांनी प्रसिद्धीस दिली आहेत.

हे फर्निचर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत शिवसेना कार्यालयाबाहेर ठेवले होते, असेही त्यांनी सांगितले. या फर्निचरला वाळवी लागल्याने त्याचा रंग उडाला आहे आणि काही भाग तर वाळवीने खाल्ल्यामुळे नष्ट झाल्याचेही त्यात दिसते आहे. याचा अर्थ महापालिकेतला भ्रष्टाचार आता रस्त्यांवरील खड्डे, किंवा गटारे वा कचरा उचलण्याची कंत्राटे यापुरता मर्यादित राहिला नसून तो आता राजकीय पक्षांच्या दालनातील फर्निचरपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच कपाटाला या भ्रष्टाचाराने पोखरल्याचे दिसते आहे.

मोठी बातमी - ' संशोधनातून समोर आली नवीन माहिती, 6 फूट उंच व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक

हा अत्यंत उथळ प्रकार असून मुंबईकरांसाठी ही अत्यंत दुर्देवाची बाब आहे. आपल्याच दालनातील कपाट देखील धडधाकट बनवू न शकणारे सत्ताधारी मुंबईकरांना चांगल्या दर्जाचा सोयीसुविधा देऊ शकतील का, याचा सर्वांनीच विचार करायची वेळ आली आहे, असेही खणकर यांनी सांगितले आहे. सध्या मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष पहारेकऱ्याच्या भूमिकेत असल्याने सर्वच पातळीवरील भ्रष्टाचार उघड करणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

bjp targets shivsena over using bad quality furniture in their own office at BMC


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp targets shivsena over using bad quality furniture in their own office at BMC