
घाटकोपर : देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांनाही गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी मुंबईतून "बॉर्डरचा राजा' आज जम्मू-काश्मीरला रवाना होणार आहे. मानवाधिकार कार्यकर्ते किरण बाळा-इशर आणि शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक छत्रपती आवटे यांच्यातर्फे दरवर्षी काश्मीर खोऱ्यातील पुंछ गावात सैनिकांसाठी मुंबईहून गणेशमूर्ती पाठवली जाते. त्यानुसार यंदाच्या गणेशमूर्तीचे पाद्यपूजन शनिवारी (ता. 1) कुर्ल्यातील श्री सिद्धिविनायक चित्रशाळेत होणार असून, रात्री मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथून स्पेशल ट्रेनने दोन हजार किलोमीटर प्रवास करत गणेशमूर्ती जम्मू-काश्मीरला पोहोचणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ गाव नेहमी अतिरेक्यांच्या व पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईमुळे दहशतीखाली असते. भारतीय सैनिक रात्रंदिवस गावातील सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा देत असतात. मायभूमीच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांना वर्षभर कोणताच उत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळे मूळचे याच पुंछ गावचे असणारे किरण बाळा इशर व शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक छत्रपती आवटे गेल्या 11 वर्षांपासून भारतीय सैनिकांसाठी 10 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी ते मुंबईहून मूर्ती पाठवतात. यंदा आर्मी ब्रिगेडमध्ये मराठा रेजिमेंटसोबत हा उत्सव साजरा करणार असल्याचे किरण बाळा इशर यांनी सांगितले. गेल्या वर्षी काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याने तिथे मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे "बॉर्डरच्या राजा'च्या प्रवासात अडथळे आले होते. यंदा कोरोना संकटामुळेदेखील हे अडथळे कायम आहेत, असे त्यांनी सांगितले. "बॉर्डरच्या राजा'ची मूर्ती श्री सिद्धिविनायक चित्रशाळेतील मूर्तिकार विक्रांत पांढरे यांनी साकारली आहे. दरवर्षी आम्ही बाप्पाचे नागरिकांच्या उपस्थितीत "भारत माता की जय', "वंदे मातरम', अशा घोषणा देत गणेश स्तोत्र मंत्राद्वारे पाद्यपूजन करतो, असे शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक छत्रपती आवटे यांनी सांगितले.
बॉर्डरचा राजाही क्वांरटाईन
यंदा राज्य सरकारच्या नियमांमुळे "बॉर्डरच्या राजा'ची दीड फूट गणेशमूर्ती पुंछ गावाला नेण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा बॉर्डरचा राजा गणेशोत्सवाच्या 15 दिवसआधीच रवाना होऊन सरकारच्या नियमाप्रमाणे आयोजकांसह क्वारंटाईन होणार आहे.
तिरंगा फडकावत होते स्वागत
दरवर्षी मुंबईतून पुंछ गावात येणाऱ्या बॉर्डरच्या राजाचे भारतीय लष्कराकडून तिरंगा फडकावत, गुलाल उधळत जंगी स्वागत करण्यात येते. यंदा लष्कराच्या परवानगीनुसार आणि दिलेल्या नियमानुसार सैनिक सामाजिक अंतर ठेवत व अत्यंत शांततेने तिरंगा फडकावत गणेशमूर्तीचे स्वागत करणार आहेत, असे किरण बाळा इशर यांनी सांगितले.
----------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)