BLOG : आयआयटीचे जेन व्हिजन! 

BLOG : आयआयटीचे जेन व्हिजन! 

"आयआयटी बॉम्बे'मधील जैवविज्ञान व जैवतंत्रज्ञान विभागाचे मूलभूत विज्ञानातील संशोधनात अभूतपूर्व योगदान आहे. या विभागाला भेट देण्याची संधी यंदाच्या "जेनव्हीजन 2020' या कार्यक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. या विभागातील तरुण संशोधकांनी आपले काम लोकांपर्यंत जावे, यासाठी 25 आणि 26 जानेवारीला "जेनव्हीजन 2020' आयोजित केले आहे. त्यानिमित्त... 

एकविसावे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय संपन्न ठरणार, याची झलक पहिल्या दोन दशकांतच दिसून आली आहे. गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध, जैवयांत्रिक अवयव (रोबोटिक बॉडी पार्टस), एड्‌सवरील नवी उपचारपद्धती, कॅन्सरपीडित रुग्णांच्या जनुकांचा सखोल अभ्यास, प्रयोगशाळेत तयार केली गेलेली कृत्रिम इंद्रिये या व अशा अनेक शोधांनी विज्ञानातील बरीच कोडी सोडवण्यात जगभरातील वैज्ञानिक यशस्वी झाले आहेत. यात भारतीय वैज्ञानिकांचाही अगदी मोलाचा वाटा! त्यातही मूलभूत विज्ञान; तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात "आयआयटी बॉम्बे'चे योगदान उल्लेखनीय आहे. ब्रिक्‍स देशांमधील विद्यापीठांच्या क्रमवार यादीत पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये "आयआयटी बॉम्बे'चा समावेश होतो. 

"आयआयटी बॉम्बे'मधील 22 विभागांपैकी एक असलेल्या जैवविज्ञान व जैवतंत्रज्ञान विभागाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. 1986 मध्ये रसायनशास्त्र विभागातील एक उपविभाग म्हणून जैवविज्ञान विभागाची सुरुवात झाली. या विभागाची पायाभरणी करण्यात प्रा. के. के. राव, प्रा. नारायण पुणेकर व प्रा. पी. के. भट यांचा मोलाचा वाटा आहे. जेमतेम एक-दोन प्रयोगशाळा ते आजच्या संशोधनात अग्रणी विभाग या यशस्वी प्रवासाचे श्रेय द्यावे ते- विभागातील 27 हाडांच्या संशोधकांना आणि त्यासोबतच अनेक पदव्युत्तर व पीएचडी जिज्ञासूंना! 
हजारो लोकांना मृत्यूच्या खाईत लोटणारी 1984 ची भोपाळ वायुगळती जगातील सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटना म्हणून ओळखली जाते. भोपाळ येथील युनियन कार्बाइड कंपनीतील मिथाईल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले. ही कंपनी "कारबारील' नामक कीटकनाशक तयार करणारी होती. कारबारील हे कीटकनाशक अजूनही मोठ्या प्रमाणात भारतात वापरले जाते. या कीटकनाशकांच्या बेसुमार वापराने मातीची सुपीकता कमी होते. त्यासोबतच पीकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेल्या मातीतील जीवाणू, मधमाशा आणि इतर कीटकांची संख्यादेखील कमी होते. त्यामुळे फळधारणेसाठी आवश्‍यक परागीकारणाची प्रक्रिया होत नाही. कीटकनाशकांचे नैसर्गिक विघटनाची प्रक्रिया खूप धीम्या गतीने होते. त्यामुळे निसर्गातील अन्नसाखळी, गांडूळ; तसेच मानवी आरोग्यावर याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. प्रा. प्रशांत फळे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी या कीटकनाशकाचे विघटन करणारे उपयुक्त जीवाणू शोधून काढले आहेत. भविष्यात या जीवाणूंना जैवतंत्रज्ञानाने विकसित करून त्यांची विघटन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या विकसित जीवाणूंना प्रदूषित मातीत मिसळल्यावर त्या मातीची सुपीकता, अन्नधान्याचे उत्पादन आणि गुणवत्ता पुन्हा वाढवता येऊ शकते. 

कर्करोग व मधुमेहाशिवाय भारतीय; तसेच आशियाई भूखंडात मलेरियाचा प्रभाव अजूनही दिसून येतो. मलेरिया हा "प्लासमोडीयम'नामक जंतूमुळे होणारा रोग आहे. या जंतूंचा प्रसार "अनाफेलेस' जातीच्या डासाची मादी करते. मलेरियावर अनेक औषधे आणि उपचारपद्धती उपलब्ध आहेत. मात्र त्या उपचारपद्धती ह्या जंतूंचा नायनाट करण्यात प्रभावी ठरत नसल्याचे आढळले आहे. "प्लासमोडीयम' हा जंतू विशिष्ट प्रथिनांचा वापर करून लाल रक्तपेशींचा नाश करतो. त्या प्रथिनांच्या विरुद्ध औषध निर्मितीचे संशोधन प्रा. प्रसेनजीत भौमिक यांच्या प्रयोगशाळेत केले जात आहे. या प्रथिनांची स्फटिके तयार करून प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास केला जातो. ह्या प्रथिनांची कार्यक्षमता नष्ट करणारी नवी औषधे मलेरियासाठी अत्यंत गुणकारक ठरतील. 

कर्करोगाशी लढा देण्यासाठी "कार टी सेल्स' विकसित करण्यात डॉ. राहुल पुरवार आणि त्यांच्या संशोधन गटाने यश मिळवले आहे. कर्करोगबाधित रुग्णांना सामना फक्त रोगाशी करावा लागतो, असे नाही; तर खरा सामना असतो तो केमोथेरपीमुळे होणाऱ्या असह्य वेदनांचा! या केमोथेरपीमुळे कर्करोगाच्या पेशींसोबत निरोगी पेशींचाही नाश होतो. यावर पर्याय म्हणून डॉ. रोहित श्रीवास्तव यांनी अनोखी फोटोथर्मल उपचारपद्धती विकसित केली आहे. यासाठी अतिसूक्ष्म असे नॅनो मीटर मापाचे नॅनोकण तयार केले आहेत (मानवी केसाला एक लक्ष तुकड्यांमध्ये तोडले तर त्यातल्या एका तुकड्याचा आकार म्हणजे एक नॅनो मीटर). ह्या नॅनोकणांवर सोन्याच्या कणांचा मुलामा चढवला आहे. हे सोन्याने लेपलेले नॅनोकण प्रकाश ऊर्जेचे उष्णतेत रूपांतरण करतात आणि ही उष्णता कर्करोगाच्या पेशींना नष्ट करते. हे नॅनोकण फक्त कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करतात; त्यामुळे निरोगी पेशी सुदृढ राहतात. कर्करोगबाधित उंदरावर केल्या गेलेल्या ह्या उपचारपद्धतीने कर्करोगाचा समूळ नाश होतो हे सिद्ध केले आहे. फक्त कर्करोगाच्या पेशींना नष्ट करणारी ही फोटोथर्मल उपचारपद्धती इतर हानिकारक उपचारपद्धतींना मात देईल, असा डॉ. रोहित श्रीवास्तव यांचा दावा आहे. 

यात जैवविज्ञान व जैवतंत्रज्ञान विभागातील विविध विषयांवर काम करणारे 27 संशोधन गट आपल्या कामाचे प्रदर्शन करणार आहेत. मूलभूत संशोधन आणि त्याचे उपयोजन हा या वर्षीचा उपक्रमाचा विषय. या दोन दिवसांत जैवविज्ञान क्षेत्रातील दिग्गज वैज्ञानिकांची व्याख्याने ही संशोधक होण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी पर्वणीच ठरेल. ऍक्‍ट्रेक या देशातील कर्करोग संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, नॅशनल बर्न सेंटर या एकमेव भाजलेल्या रुग्णांसाठी असलेल्या रुग्णालयातील डॉ. ऊर्मी पालन या कार्यक्रमाचे प्रमुख वक्‍ते असतील. त्यासोबतच विभागातील प्राध्यापक यांचीही व्याख्याने होणार आहेत. यासोबतच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, जेनेटिक स्वीच अशा मेंदूला खुराक देणाऱ्या स्पर्धादेखील आयोजित केल्या आहेत. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विभागातील काही प्रयोगशाळांना भेटही देता येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com