esakal | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 'BMC'चा प्लॅन काय? वाचा सविस्तर मुलाखत
sakal

बोलून बातमी शोधा

Dr mangala Gomare

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 'BMC'चा प्लॅन काय? वाचा सविस्तर मुलाखत

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत (Mumbai) 15 ऑगस्टपासून निर्बंध (lockdown) शिथिल करण्यात आले आहेत. या दरम्यान आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू (corona patients) लागली आहे. तिसरी लाट (corona third wave) ही सप्टेंबर अखेरपर्यंत येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची (BMC) काय तयारी आहे? ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड, आणि इतर सर्व गोष्टीं मुंबई महापालिका कशा रितीने प्रयत्नशील आहे ? याविषयी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे (Dr. Mangala Gomare) यांच्याशी केलेली बातचित.

हेही वाचा: 'पाप केले की कोरोना होतो'; संजय राऊतांच्या विधानाचा भाजपकडून समाचार

कोरोनाची मुंबईतील सद्यस्थिती काय ?

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. याबाबतची आयुक्त पातळीवर आढावा बैठकही झाली आहे. रुग्ण जरी वाढत असले तरी गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. ही एक जमेची बाजू आहे तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर आपण भर देत आहोत, त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेमधे लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, आपण पेडियाट्रिक बेड पण वाढवलेले आहेत. मालाडला जंम्बो कोविड सेंटर चालू आहेत. तिथेही पेडियाट्रिक बेड आहेत आणि इतरही ठिकाणी पेडिऍट्रिक्स बेड आपण राखीव ठेवलेले आहेत. या संदर्भातील बरीचशी तयारी पूर्ण झाली आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट हा मुंबईसाठी किती घातक आहे ?

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आपल्याकडे 11 रुग्ण आहेत. त्यापैकी 2  रुग्ण होम आयसोलेटेड होते आणि त्यातले बरेचशे रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत, त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तो ही त्या रुग्णाला वेगवेगळे आजार होते आणि त्यानंतर तिला कोविड झाला त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डेल्टा प्लस हा व्हेरिएंट जास्त घातक असेल असं वाटत नाही.

कोरोनाची तिसरी लाट कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे?

रुग्ण 15 ऑगस्ट नंतर वाढलेले दिसत आहेत.  आता गणेशोत्सवानंतर रुग्णांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येऊ शकते, पण तिसरी लाट नक्की कधी येईल? त्याबद्दल आताच काही सांगू शकत नाही. टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये तिसरी लाट येऊ शकेल.

हेही वाचा: माथेरानची निसर्गसंपदा बहरली

मुलांसाठी मुंबईत काय तयारी आहे?

मुलं जास्त संक्रमित होतील असे सांगितले जात असले तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये एकूण रुग्णांच्या 10% पेक्षा जास्त मुलांचा सहभाग नाही.  त्यातही 0-18 वयोगटातले मूलं आहेत . 10% जरी लहान मुलांना संसर्ग झाला तरी आपली बऱ्यापैकी तयारी आहे. सर्व स्टाफ प्रशिक्षित आहे. पेडिऍट्रिक स्टाफ ही प्रशिक्षित आहे. लहान मुलांना उपचार कसे द्यायचे याचे ही प्रशिक्षण दिले गेले आहे.

मुंबईतील कोरोना नियंत्रणात आहे का?

सध्या कोरोना नियंत्रित आहे, असं म्हणता येईल. कारण, रोजच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. तसेच गंभीर रुग्णांमध्ये ही वाढ झालेली नाही. त्यामुळे, सध्या तरी कोरोना नियंत्रणात आहे असं म्हणता येईल. जर केसेस वाढल्या असं लक्षात आलं तर लॉकडाऊन बद्दल जो निर्णय आहे तो सरकारी पातळीवर घेतला जाईल. 2 आठवड्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं कि रुग्ण वाढतायत तेव्हा आपण पुन्हा कंटेनमेंट झोन्स चा निर्णय घेतला.

5 पेक्षा जास्त रुग्ण सापडणाऱ्या बिल्डिंग सील केल्या. कंटेनमेंट झोन पण वाढलेले आहेत आणि आवश्यक ते सर्व उपाययोजना आपण राबवल्या आहेत. मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर ही कारवाई सुरु केली आहे. रुग्ण जर वाढत असतील तर कंटेनमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवले जातील. चाचण्याही वाढवल्या आहेत. आता सध्या 30 ते 40 हजार चाचण्या होतात, मागच्या आठवड्यात पॉझिटीव्हिटी रेट 1% पेक्षा जास्त आला आहे, पण चाचण्या व्यवस्थित करत आहोत.

दररोज चाचण्यांची क्षमता किती ?

चाचण्या वाढवण्यासाठी आपण नियमावली काढली आहे.  त्यामध्ये हाय रिस्क या श्रेणी मध्ये येणारे म्हणजे वयस्कर व्यक्ती , गर्भवती महिला, किंवा कोमाॅर्बीड परिस्थिती असलेले व्यक्ती असतील किंवा कंटेनमेंट झोन मधल्या व्यक्ती असतील तर त्यांची चाचणी तातडीने करून घ्यावी तसेच काही दिवसांनी पुन्हा त्यांची चाचणी करावी अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आरटी पीसीआरचे प्रमाण ही वाढवण्याकडे आम्ही भर देत आहोत, जेणेकरून कोणता ही पॉझिटीव्ह रुग्ण निसटणार नाही.

हेही वाचा: शिवसेना भाजपा पुन्हा आमने सामने

265 ठिकाणी चाचण्या होणार आहेत त्याची तयारी क्षमता

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 70 % प्रमाण हे आरटी पीसीआर चाचण्यांचे असले पाहिजे आणि 30 % हे रॅपिड चाचणीचे असले पाहिजे ते आम्ही नियमित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. दररोज 1 लाख पर्यंत चाचण्या करण्याची पालिकेची क्षमता आहे. तसेच, आरटीपीसीआर आणि 60 हजार अँटीजेन करण्याची आपली क्षमता आहे. सरकारी रुग्णालये, खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम्स, सरकारी दवाखाने हे सर्व मिळून 1 लाख कोविड चाचणी आणि 60 हजार अँटीजेन टेस्ट करू शकतो.

मुंबईचं लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल त्यासाठी काय उपाययोजना आहेत ?

जवळपास 75% लोकांचा पहिला डोस झाला आहे आणि 25% लोकांचा दुसरा डोस झाला आहे. तसेच, हॉटेलमध्ये काम करणारे, डिलिव्हरी बॉय, कुरिअर पोहचवणारे, टॅक्सी आणि ट्रक ड्राइवर असे जे सुपर स्प्रेडर आहेत ह्यांचं लसीकरण लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही कॅम्प आयोजित करत आहोत जेणेकरून त्यांचं लसीकरण लवकर पूर्ण होईल, देहविक्री करणारे, तृतीयपंथी किंवा अंथरुणाला खिळून बसलेले अशा लोकांचं आपण विशेष कॅम्प घेऊन लसीकरण पूर्ण करत आहोत.

लसीकरण पूर्ण होण्यासाठी जर आपण दररोज 1 लाख डोस देऊ शकलो तर जवळपास 3 महिन्यात लसीकरण पूर्ण होईल. अजून 80 लाख लोकांचं लसीकरण बाकी आहे. 3 महिन्यात पहिला डोस घेणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होईल आणि दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी 3 महिन्यांनी तारीख असेल. जर लसींचा पुरवठा व्यवस्थित झाला तर 3 महिन्यात पहिला डोस घेणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होईल.

हेही वाचा: मुंबई काँग्रेसकडून कोरोना योद्ध्यांचा गौरव; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

कोविड नंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कोणते बदल होणे गरजेचे आहे ?

मुंबईमध्ये बेड्स किंवा अत्यावश्यक सुविधांची कमतरता भासणार नाही. आपण तीन मोठी जंबो कोविड केंद्र उभारली आहेत.  तसेच, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशांना दाखल करता येईल अशी ही व्यवस्था आपण केली. हॉटेल्स, शाळांमध्ये ही कोविड सेंटर उभी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधा वाढवल्या आहेत. रुग्णालयांची क्षमता वाढवली आहे. त्यामुळे, नॉन कोविड मध्ये ही आपल्याला याचा चांगला फायदा होणार आहे.

नागरिकांना काय सुचना ?

कोविड अप्रोप्रिएट त्रिसूत्री म्हणजे मास्क लावा, हात वारंवार धुवा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि लवकरात लवकर लस घ्या हे प्रत्येक नागरिकाला पाळायलाचं लागणार आहे. कोविड चे रुग्ण कमी झाले असले तरी भीती ही अजून बाकी आहे. कोविड अजून पूर्णपणे गेलेला नाही. गर्दीच्या ठिकाणी आता ही संसर्ग होण्याची भीती आहे. लसीकरण लवकरात लवकर करून घेतले तर सुरक्षा मिळण्यात मदत होईल.

तिसऱ्या लाटेची एकूण तयारी

एकूण 31 हजारांहून अधिक बेड्स

15 हजार ऑक्सिजन बेड्स

12 हजार नाॅन ऑक्सिजन बेड्स

3200 आयसीयू बेड्स

3000 व्हेंटिलेटर

2200 हून अधिक पेडियाट्रिक बेड्स

600 मातांसाठी बेड्स

loading image
go to top