आर्थिक संकटातही महापालिकेकडून उधळपट्टी; आयुक्तांच्या बंगल्याच्या डागडूजीसाठी होणार 40 लाखांचा खर्च

आर्थिक संकटातही महापालिकेकडून उधळपट्टी; आयुक्तांच्या बंगल्याच्या डागडूजीसाठी होणार 40 लाखांचा खर्च

मुंबई : कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे महापालिकेला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने पालिकेने काटकसरीचे धोरण अवलंबले. मात्र तरी सु्द्धा पालिकेकडून अनावश्यक खर्च होत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटातही महापालिकेने आयुक्तांच्या बंगल्याची डागडूजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी किमान 40 लाख रुपयांपर्यंत खर्च होणार असून त्यासाठी महापालिकेने निविदाही मागवल्या आहेत.

लॉकडाऊनमध्ये मुंबई महापालिकेचे उत्पन्न जुलै महिन्यापर्यंत 4 हजार कोटी रुपयांनी घटले. त्यातच चार वर्षांपूर्वी दुरुस्ती झालेल्या बंगल्यासाठी आता पुन्हा एकदा 40 लाखापर्यंतचा खर्च करण्यात येणार आहे. 2016 मध्ये महापालिका आयुक्तांच्या बंगल्याची डागडुजी झाली होती. त्यासाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. आताची दुरुस्ती ही तातडीची असून काही ठिकाणी छतातून पाणी गळत असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, चार वर्षांपूर्वी झालेल्या दुरुस्तीत रुफ शिट बदलण्यात आली होती. त्यानंतरही छत गळत असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. 

उत्पन्न घटल्यामुळे महापालिका आता कॉस्ट कटिंगचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विभागाचा किमान 10 ते 15 टक्के खर्च कमी होणार आहे. अशा परिस्थीतीत चार वर्षांपूर्वी दुरुस्ती झालेल्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा 40 लाख रुपये खर्च करण्यावरुन नवा वाद सुरु होण्याची शक्‍यता आहे.


9 वर्षात 92 लाख
ताडदेव जवळील एम.एल.डहाणूकर मार्गावर हा बंगला 1930 मध्ये बांधला असून तो हेरीटेज श्रेणीतील आहे. 2011 पासून या बंगल्याच्या डागडूजीसाठी आता पर्यंत 92 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2015 मध्ये झालेल्या कामात डागडुजी बरोबर बंगल्यांची रंगरंगोटी करण्यात आली होती. तसेच फायबर ग्लासचे छत बसवण्यात आले होते. तसेच इतरही काही कामे करण्यात आली होती. त्यावेळीस 29 लाख 54 हजार रुपये खर्च करण्यात आला होता. 2011 मध्ये 24 लाख 10 हजार त्यानंतर 2012 मध्ये 39 लाख 29 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. 

सामनाचा आजचा अग्रलेख 'आजोबा- नातवा' वर, शिवसेनेला वाटतंय...

निवासस्थानाचे काही भाग जीर्ण झाली असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. छतावर प्लास्टिकची ताडपत्री टाकण्यात आली असूनही खोल्यांमध्ये पाणी गळत आहे. जर कोणाला खात्री करायची असेल प्रत्यक्ष निवासस्थानाची पाहाणी करावी, त्यानंतर त्यांनीच सांगावे दुरुस्ती करावी अथवा करु नये.
-इक्‍बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका.

संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com