ऑक्सिजन सिलिंडर मिळालं नाही म्हणून बहिणीचा झाला मृत्यू,  मग भावानेही उचललं मोठं पाऊल आणि...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

ऑक्सिजन सिलिंडर अभावी बहिणीचा मृत्यू झाल्याने भावाने आपली आवडती गाडी विकून रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : ऑक्सिजन सिलिंडर अभावी बहिणीचा मृत्यू झाल्याने भावाने आपली आवडती गाडी विकून रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यास सुरुवात केली आहे. मालाडमधील शाहनवाज खान असे या तरुणाने नाव असून आतापार्यंत त्याने 250 पेक्षा अधिक कुटुंबांना मदत केली आहे. पुढे देखील कोरोना योद्धा म्हणून गरजूंना सेवा पुरवण्याचा निर्धार त्याने केला आहे.

मालाडमध्ये राहणारे 31 वर्षीय शाहनवाज शेख यांची फोर्ड एनडेव्हर ही अतिशय आवडली कार. ही कार त्यांनी 2011 मध्ये विकत घेतली. मोठी रक्कम खर्च करून आपल्या आवडत्या गाडीसाठी त्यांनी 007 हा नंबर मिळवला. शेख हे संगीतप्रेमी असल्याने त्यांनी गाडीत अत्याधुनिक 'म्युसिक सिस्टम' ही लावून घेतला. मात्र लॉकडाऊन काळात लोकांची निकड लक्षात घेऊन त्यांनी आपल्या आवडत्या गाडीचा चक्क अम्ब्युलन्स मध्ये रूपांतर केलं.

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

शाहनवाज शेख यांची बहीण त्यांच्या व्यवसायात पार्टनर होती. मात्र तिचा सहा महिन्यांची प्रेग्नन्ट असतांना 28 मे रोजी कोविड19 मुळे रुग्णालयाच्या बाहेर ऑटोरिक्षात मृत्यू झाला. बहिणीला वेळेत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर शेख यांनी आपली आवडतील एसयूव्ही कार विकून काही ऑक्सिजन सिलेंडर विकत घेतले. आणि गरजूंना मोफत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. शेख यांनी 5 जूनपासून ही सेवा सुरू केली असून आतापर्यंत त्यांनी 250 पेक्षा अधिक कोविड 19 ने बाधित कुटुंबांना ही सेवा पुरवली आहे. 

शाहनवाज शेख यांच्या बहिणीला त्रास जाणवू लागताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र 5 रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. काहींनी ती कोविड 19 ने ग्रस्त असल्याने प्रवेश नाकारला तर काहींनी बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले. तर काही रुग्णालयात व्हेंटिलेटरची व्यवस्था नव्हती. ही करुण कहाणी सांगताना शाहनवाज यांचे आज ही डोळे भरून येतात.

मोठी बातमी - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध न झाल्याने शाहनवाज शेख यांच्या बहिणीने रुग्णालयाच्या बाहेर रिक्षामध्ये आपला प्राण सोडला. मात्र त्यांना त्यावेळी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला असता तर त्यांचे प्राण वाचले असते असे जेव्हा एका ओळखीच्या डॉक्टरने सांगितले. तेव्हा मात्र शाहनवाज यांना अतिशय वाईट वाटले. त्याचवेळी त्यांनी आपली गाडी विकून ऑक्सिजन सिलेंडर विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात ऑक्सिजन सिलेंडर विकत घेऊन ते मोफत गरजूंना पुरविण्यास सुरुवात केली.

ऑक्सिजन सिलेंडर विकत घेतल्यानंतर शाहनवाज यांनी आपल्या मित्रासोबत सोशल मीडियावर मेसेज टाकून गरजूंना संपर्क करण्याचे आवाहन केले. रुग्णाला ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता असल्याचे डॉक्टरने शिफारस केलेली असावी तसेच गरजूंना स्वता येऊन सिलेंडर घेऊन जावे लागेल या दोन अटींवर ही सेवा सुरू करण्यात आली. पण ज्या रुग्णांना स्वतः येणे शक्य नसते किंवा जेथे संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन असते तेथे मात्र शाहनवाज यांचे व्हेंटिलेटरची सेवा पुरवतात. त्यासाठी शाहनवाज यांनी व्हेंटिलेटरची टीम बनवली असून पीपीई किटची सुविधा ही पुरवली आहे. सध्या शाहनावाज मालाडपासून हाजी अली पर्यंत आपली सेवा देत आहेत.

हेही वाचा : मादक सौंदर्याची व्याख्या सांगणारी 'बिकिनी' अशी आली जन्माला..
 

केअर रुग्णालयातील डॉक्टर साबुद्दीन शेख यांनी या कामात शाहनवाज यांना मार्गदर्शन केले. अक्सिजन सिलेंडर कशाप्रकारे आणि किती प्रमाणात वापरावा याबाबत माहिती दिली. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील तयार केला आहे. मात्र रुग्णाची परिस्थिती कशी आहे आणि त्यांना किती प्रमाणात ऑक्सिजनची गरज आहे रुग्णाने आपल्या डॉक्टरांशी बोलून ठरवावे असे आवाहन ही शेख यांनी केले आहे. ही रुग्णालयांच्या तोडीची सुविधा आहे असा दावा नाही. मात्र कृत्रिम श्वासाची गरज असणाऱ्या रुग्णांना सेवा पुरवत असल्याचे शाहनवाज यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात शाहनवाज आपल्या गाडीचा वापर ऍम्ब्युलन्स म्हणून करत होते. त्यादरम्यान त्यांनी अनेक गरजू रुग्णांना रुग्णालयांपर्यंत पोहोचवले आहे. त्यावेळी त्यांना स्वतःची  खूपच काळजी घ्यावी लागत होती. त्यांच्या घरी पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी असल्याने ते घरातील एका कोपऱ्यात राहत होते. स्वतःला पूर्ण सॅनिटायझ केल्याशिवाय ते त्यांच्या जवळ देखील जात नव्हते. शेवटी लोकांची गरज ओळखून त्यांनी आपली आवडती गाडी विकण्याचा निर्णय घेतला.

या कार्यासाठी आपली आवडती गाडी विकण्याचं कोणतही दुःख शाहनवाज यांना नाही. आपल्या या प्रयत्नामुळे गरजूंना मदत होतेय याचं समाधान त्यांना आहे. या सेवेमुळे अनेक कुटुंबांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असून एक दिवस आपण एका ऐवजी आपण चार गाड्या घेऊ असा विश्वास ही त्यांना आहे. 

brother sold his car to provide free oxygen cylinder to needy patients

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brother sold his car to provide free oxygen cylinder to needy patients