ठाणेकरांवर पाणी दरवाढीचा बोजा

राजेश मोरे
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे सारे वारे वाहून गेल्यानंतर आता ठाण्यात महापालिका प्रशासनाच्या दरवाढीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे ठाणे महापालिकेच्या परिवहन (टीएमटी) उपक्रमाने तिकीट दरवाढीची तयारी केली असताना दुसरीकडे पालिकेनेही पाणी दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे सारे वारे वाहून गेल्यानंतर आता ठाण्यात महापालिका प्रशासनाच्या दरवाढीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे ठाणे महापालिकेच्या परिवहन (टीएमटी) उपक्रमाने तिकीट दरवाढीची तयारी केली असताना दुसरीकडे पालिकेनेही पाणी दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना आतबट्ट्याचा व्यवहार ठरत असल्याने पालिका प्रशासनाने हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांवर वाढत्या महागाईत पाणी दरवाढीचा बोजाही पडणार आहे. 

माथेरानमध्ये पर्यटकांच्या डोक्यावर मृत्यूच्या घिरट्या

सुमारे पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरात आजच्या घडीला 1 लाख 26 हजार ग्राहक असून यामध्ये झोपडपट्टी आणि इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा समावेश आहे; तर व्यापारी वापराचे 5 हजारांच्या आसपास ग्राहक आहेत.

महापालिका प्रशासनाला पाणी अथवा कोणतीही दरवाढ केली तर त्याला राजकीय विरोध होण्याची सवय झाली आहे. अशा वेळी केलेली दरवाढ ही कमी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन सुमारे चाळीस टक्के दरवाढ पालिका प्रशासनाकडून सुचविण्यात आली आहे. 

ही दरवाढ केवळ सर्वसाधारण सभेपुरती मर्यादित राहणार नसून महापालिकेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील अर्थसंकल्पातही तब्बल पन्नास टक्के दरवाढ केवळ पाणीपट्टीमध्ये करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. ठाणे पालिका प्रशासनाकडून पाणीपट्टीमध्ये शेवटची दरवाढ 2013 मध्ये करण्यात आली होती. मात्र आताही या दरवाढीला मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्‍यता आहे. 

पोलिस खबऱ्याचा मॉडेल तरुणीवर बलात्कार

पाणीपुरवठा विभागाकडून झोपडपट्टीधारकांना कितीही पाणी वापरले तरी सरसकट प्रत्येक कुटुंबाकडून 130 रुपये आकारले जातात; तर इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून चौरस फुटामागे 200 ते 500 रुपये याप्रमाणे बिलआकारणी केली जाते.

2016 मध्ये इमारतधारकांकडून चौरस फुटानुसार पाणीबिलाची आकारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता मात्र झोपडपट्टीधारकांसह इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या पाणीपट्टीतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झोपडपट्टीधारकांना यापुढील काळात 130 ऐवजी 200 रुपये आकारले जाणार आहेत. 

...अन्यथा सत्ताधारी शिवसेनेला चटके 
मुळात पाणीपुरवठा करताना पालिकेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. आजच्या घडीला वर्षाला केवळ पाणीपुरवठा विभागाच्या कारभारासाठी 250 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र कमी दरात पाणीपुरवठा होत असल्याने महापालिकेच्या तिजोरीत केवळ 110 कोटी जमा होतात. पुरवठा आणि मिळकतीमध्ये एकूण तूट सुमारे 67 टक्के आहे. तसेच महापालिकेचे स्वतःचे धरण नसल्याने त्यांना इतर संस्थांकडून पाणी विकत घ्यावे लागते. या संस्थांकडूनही पाण्याची दरवाढ करण्यात आलेली आहे. पाण्याचे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्याने ही दरवाढ सुचविण्यात आली आहे. मात्र या पाणी दरवाढीला जोरदार विरोध झाल्यास त्याचे चटके सत्ताधारी शिवसेनेला निश्‍चित बसणार आहेत. 

अशी असेल दरवाढ 

  • झोपडपट्टीधारकांना 130 रुपयांऐवजी 200 रुपये आकारले जाणार आहेत. यापूर्वी झोपडपट्टी धारकांकडून प्रति 1 हजार लिटरमागे 7.50 रुपये मोजावे लागत होते. आता त्यासाठी 13 रुपये मोजावे लागणार आहे. ही दरवाढ ज्या ठिकाणी मीटरप्रमाणे पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी मीटरप्रमाणो होत नाही, त्या ठिकाणीही लागू असणार आहे.
  • दुसरीकडे इमारतधारकांकडून यापूर्वी 250 चौरस फुटामागे घर असल्यास 200 रुपये आकारले जात होते; तर 2 हजार 500 चौरस फूट घर असल्यास 500 रुपये आकारले जात होते. आता 200 चौरस फुटामागे 300 आणि 2500 चौरस फुटामागे 750 रुपये आकारले जाणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The burden of raising water on Thanekar