मिरा-भाईंदरमध्ये भटक्‍या श्‍वानांच्या उपचारासाठी केंद्र, उपक्रम राबवणारी देशातील दुसरी पालिका

सचिन सावंत
Tuesday, 20 October 2020

निर्बीजीकरण व लसीकरणालादेखील सुरुवात करण्यात आल्याने असा उपक्रम राबवणारी मिरा-भाईंदर महापालिका मुंबई महापालिकेनंतर देशात दुसरी पालिका ठरली आहे.

मिरा रोड : मिरा-भाईंदर पालिकेने उत्तन शिरेगाव परिसरात 2004 मध्ये सुरू केलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्राला पर्याय म्हणून नजीकच्या धावगी-डोंगर घनकचरा प्रकल्पाशेजारी भटक्‍या श्वानांच्या उपचारासाठी नवे केंद्र सुरू केले आहे. रॅबिज व डिस्टेंपर या रोगावर नियंत्रण ठेवण्यासह जखमी श्वानांवरील उपचार तसेच मृत श्‍वान, मांजर यांची उत्तरीय तपासणी आता या केंद्रात होणार आहे. 
तसेच मांजरींच्या निर्बीजीकरण व लसीकरणालादेखील सुरुवात करण्यात आल्याने असा उपक्रम राबवणारी मिरा-भाईंदर महापालिका मुंबई महापालिकेनंतर देशात दुसरी पालिका ठरली आहे. या ठिकाणी श्वानांच्या निवाऱ्यासाठी 20 पिंजऱ्यांची सोय करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिली. 

अधिक वाचाः  मास्क किंमती नियंत्रण प्रस्ताव धूळखात, राज्य सरकारला अहवाल सादर

मिरा-भाईंदर शहरात सुमारे 20 हजारांहून अधिक भटक्‍या श्‍वानांची संख्या आहे. शहरात भटक्‍या श्‍वानांची संख्या तसेच त्यांचा उपद्रव वाढू लागल्याने पालिकेने 2004 मध्ये उत्तनमधील शिरेगाव येथे श्‍वानांवरील निर्बीजीकरण व लसीकरण केंद्र सुरू केले होते. दरम्यानच्या काळात श्‍वानांना रॅबिज व डिस्टेंपर या संसर्गजन्य रोगाची लागण होऊ लागल्याने त्यांच्या उपचाराची सोयदेखील याच केंद्रात सुरू करण्यात आली. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रात 45 पिंजरे बसविण्यात आले आहेत. श्‍वानांच्या लसीकरण व निर्बीजीकरणासह त्यांच्यावरील उपचार एकाच ठिकाणी होत असल्याने रॅबिज व डिस्टेंपर या संसर्गजन्य रोगाची लागण निर्बीजीकरणासाठी आणलेल्या श्वानांनाही होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून या रोगावरील नियंत्रणासाठी स्वतंत्र नवीन केंद्र सुरू करण्याच्या प्रतीक्षेत होते. 

अधिक वाचाः  कल्याण पत्रीपुलाच्या कामाला वेग, गुरुवारपर्यंत पुलावरील रात्रीची वाहतूक बंद

दोन वर्षांपूर्वी उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात नवीन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम निराटले यांच्या उपस्थितीत हे केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात जखमी श्‍वानांच्या उपचारासाठी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) देखील सुरू करण्यात आला आहे. तसेच रॅबिज व डिस्टेंपर या आजारावरही येथे उपचार केले जाणार आहेत. या केंद्रात मृत श्वानांसह मांजरींची उत्तरिय तपासणीसुद्धा करण्यात येणार आहे. तसे निर्देश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. 

अधिक वाचाः  डोंबिवलीत वाहन चोरी करणारे त्रिकुट अटकेत, दोन बाईकसह ७ रिक्षा हस्तगत

ठेकेदारांची नियुक्ती - 
श्‍वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण ठेकेदाराच्या नियुक्तीअभावी रेंगाळले होते. त्याचा ठेका 5 ऑक्‍टोबर रोजी हैदराबाद येथील मेसर्स नवोदय वेट सोसायटी या संस्थेला देण्यात आल्याचे डॉ. निराटले यांनी सांगितले. सध्या ठाणे, वसई-विरार येथील श्वानांचे निर्बीजीकरण केंद्र बंद असल्याने तेथे श्वानांची पैदास वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन केंद्र महत्त्वाचे ठरणार असल्याचे डॉ. निराटले यांनी सांगितले. 

 

पालिकेने नवीन केंद्र सुरू केल्याने भटक्‍या श्‍वानांवर उपचार होणार असून याच केंद्रालगत मृत श्वानांवरील अंत्यसंस्कारासाठी दफनभूमी सुरू करण्यात येणार आहे. 
- डॉ. विजय राठोड, आयुक्त 

(संपादन : वैभव गाटे)

Center for the treatment of street dogs in mirabhayandar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Center for the treatment of street dogs in mirabhayandar