केमोथेरपी करायचीये? आता चिंता करण्याची गरज नाही. वाचा हे आहे कारण!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

  • केमोथेरपी सुविधेचा विस्तार राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत 
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा 
  • आरोग्य विभागाची आढावा बैठक घेऊन निर्णय

मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत केमोथेरपी सुविधेचा विस्तार करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली. मंत्रालयात आरोग्य विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाची आढावा बैठक घेऊन त्यांनी ही सुविधा राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

महत्वाचं - शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी म्हणतात...

राज्यात सध्या 11 जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध आहे. कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता रुग्णांना दिलासा देण्याकरिता सर्वच जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने आवश्‍यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला या वेळी देण्यात आल्या. महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगत आरोग्य विभागाला अधिकचा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. जेणेकरून आरोग्य संस्थांची अर्धवट बांधकामे, पायाभूत सुविधा आदी बाबींची पूर्तता करणे शक्‍य होणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. 

धक्कादायक - मुंबई महापालिकेत 680 कोटीचा पाणी घोटाळा

आरोग्य संस्थांचे जाळे राज्यभर पसरले असून त्यांचे बळकटीकरण, स्वच्छता, डॉक्‍टरांची उपलब्धता या बाबींवर भर देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले. उपलब्ध सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देऊन नागरिकांचा आरोग्य यंत्रणेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू या, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केले. 
बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजाराचे प्रमाण वाढत असून याविषयी नागरिकांमध्ये अधिक जाणीवजागृती करणे आवश्‍यक असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. 
डॉक्‍टरांची रिक्त पदे भरताना ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा मुबलक राहील याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिले. 

मनसेचा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आता आनंदी आनंदी 

बैठकीत विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. या वेळी आरोग्य आयुक्त अनुपकुमार यादव, महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेचे सुधाकर शिंदे, राज्य कामगार विमा रुग्णालयाचे आयुक्त आप्पासाहेब धुळज, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील, डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemotherapy facility expanded to all district hospitals in the state