समाजाशी काडीचा संबंध नाही...चालले मोठेपणा मिरवायला! 'ते' संतापले...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 February 2020

सरकारी मालमत्ता, रस्ते, चौक आणि इमारतींना स्वतःच्या नातलगांची नावे देऊन मोठेपणा मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींना पालिकेने चाप लावला आहे. नवी मुंबईतील गावांची जुनी ओळख जपून राहण्यासाठी प्रवेशावर तयार करण्यात येत असलेल्या प्रवेशद्वारांना गावांचीच जुनी नावे देण्याचा निर्णय पालिकेने सर्वसाधारण सभेत  घेतला आहे.

नवी मुंबई : सरकारी मालमत्ता, रस्ते, चौक आणि इमारतींना स्वतःच्या नातलगांची नावे देऊन मोठेपणा मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींना पालिकेने चाप लावला आहे. नवी मुंबईतील गावांची जुनी ओळख जपून राहण्यासाठी प्रवेशावर तयार करण्यात येत असलेल्या प्रवेशद्वारांना गावांचीच जुनी नावे देण्याचा निर्णय पालिकेने सर्वसाधारण सभेत  घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे स्वतःचे वडील, काका, आई, भाऊ व पत्नी यांची नावे देण्याची इच्छा असणाऱ्यांना खीळ बसली आहे. 

ही बातमी वाचली का? रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

पालिका स्थापनेआधी नवी मुंबईतील गावांचा ठाणे जिल्हा परिषदेमार्फत कारभार चालवला जात होता. त्या कळात गावासाठी झटणारे, निःस्वार्थी गावाची सेवा करणाऱ्यांना विविध पदांवर निवडून दिले जात होते. कालांतराने अशा नागरिकांची नावे देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती; मात्र अलिकडच्या काळात पालिकेत निवडून गेलेल्या नगरसेवकांनी स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते करून, विकासकामांना आपल्याच नातेवाईकांची नावे देण्याचा सपाटा लावला आहे. पालिकेच्या शाळा, रस्ते, चौक, उद्याने, मार्केट, बहुउद्देशिय इमारती, ग्रंथालये अशी एकही मालमत्ता नावे देण्यापासून सोडल्या नाहीत. त्यामुळे नवी मुंबई शहरात महापुरुषांऐवजी नगरसेवकांच्या नातेवाईकांची नावे असलेल्या मालमत्तांचा अधिक भरणा झाला आहे. नवी मुंबईतील गावांची ओळख पसून जाऊ नये. म्हणून पालिकेमार्फत २९ गावांच्या वेशीबाहेर प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू आहे. या कमानींना आपल्या नातेवाईकांची नावे देण्याचे काही अर्ज नगरसेवकांनी महापौर जयवंत सुतार यांच्याकडे केले होते; मात्र प्रवेशद्वारांना पुन्हा नगरसेवकांच्या नातेवाईकांची नावे दिल्यास मूळ जुने नाव, पुसून जाण्याची भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे सुतार यांच्या मागणीस्तव १३ जानेवारी २००१ च्या प्रचलित नामकरण नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. १ जानेवारी १९९२ ला ग्रामपंचायतींमधून थेट पालिकेत रूपांतर झालेल्या गावांची नावे प्रवेशद्वारावर दिली जाणार असल्याचे पालिकेने निश्‍चित केले आहे. 

ही बातमी वाचली का? म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि...

मोठेपणावर पाणी
पालिकेमार्फत गावांच्या वेशीवर बांधल्या जात असलेल्या प्रवेशद्वारावर आपल्या नातेवाईकांची नावे द्यावीत. याकरिता काही नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. बऱ्याच नगरसेवकांनी महापौर जयवंत सुतार यांच्याकडे अर्जही केले होते; परंतु पालिकेने गावांची जुनी नावे देण्याचाच निर्णय घेतल्यामुळे मोठेपणा मिरवणाऱ्यांच्या मनसुब्यावर विरजण पडले आहे. 

ही बातमी वाचली का? अबब... एवढा मोठा मासा जाळ्यात!

महापौर सुतार, नगरसेवक भगत यांच्यात बाचाबाची
गावाच्या प्रवेशद्वारावरील नामकरणाच्या प्रस्तावावर शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी बोलण्यास सुरूवात केली. मात्र, तुम्हाला बोलण्याची परवानगी दिलेली नाही, तुम्ही खाली बसावे, असे महापौरांनी सांगितले. यावरून दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. अखेर महापौर सुतार यांनी सर्वसाधारण सभा तहकूब केली.

ज्या होतकरू नागरिकांनी या शहरासाठी, गावासाठी थोर असे समाजकार्य केले असेल, अशा नागरिकांची नावे देण्याची पद्धत आहे; मात्र ज्या लोकांनी कधीच समाजकार्य केले नाहीत, समाजाशी कधीच संबंध नव्हता, अशा लोकांची केवळ आपले नातेवाईक असल्याने नावे देण्याची मागणी होत असेल, तर ते चुकीचे आहे. 
- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closes the tradition of naming relatives to entrances; New mumbai municipal corporation decision