येत्या दोनशे वर्षात सर्वच भाषा होणार 'नष्ट'... पाहा कोण म्हणतंय

येत्या दोनशे वर्षात सर्वच भाषा होणार 'नष्ट'... पाहा कोण म्हणतंय

ठाणे : समाजाला पर्यावरणाच्या ऱ्हासाची जशी आता जाणीव झाली आहे, तशीच जाणीव भाषेच्या बाबतीतही करुन द्यावी लागेल. पुढील तीस ते चाळीस वर्षात जगातील सहा हजार पैकी चार हजार भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असून भारतातील सहाशे भाषांचा त्यात समावेश आहे. दोनशे वर्षात सर्वच भाषा नष्ट होतील. असा इशारा भाषातज्ञ व साहित्यिक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी दिला.

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्यावतीने कै. डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नुकतेच करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक, डॉ. प्रशांत धर्माधिकारी, डॉ. महेश पाटील यांसह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. भारताती भाषांची विविधता आणि लोकशाही या विषयावर ते बोलत होते. भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते, भाषा नष्ट झाल्यावर एक अत्यंत महत्त्वाचा वैचारिक संचिताचा ऐवज नष्ट होईल. भाषेचे संवर्धन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत यावेळी गणेश देवी यांनी मांडले.

डॉ. देवी म्हणाले, सध्याच्या पिढीला विशेष करुन बोली भाषा व मातृभाषांचे संवर्धन करण्याची गरज आहे. एखाद्या देशाची संस्कृती व चिंतन याचा एकत्रित अविष्कार म्हणजे ती भाषा असते. मात्र इंग्रजी सारख्या भाषांचे आक्रमण भारतीय भाषांवर होऊन त्या आक्रसत चालल्या आहेत. त्यासोबतच भारतात असलेल्या अनेक बोलीभाषा व त्या भाषांमधून प्रकट होणारे सांस्कृतिक संचित आपण जपले पाहिजे. पूर्वी एखाद्या पिढीचे सांस्कृतिक संचित हे ग्रंथालय व संस्थात्मक पायाभरणी यातून पुढच्या पिढीत हस्तांतरित होत होते. मात्र स्मृती साठवण्याचे महत्त्वाचे कार्य आपण संगणक व मशीनला दिले आहे. त्यामुळे भाषा विरहित समाजाची निर्मिती होईल की काय? असा धोका त्यांनी व्यक्त केला. भारतीय सिद्धांत व पाश्चात्य विचार, परंपरा यांचा साकल्याने अभ्यास करून तौलनिक अभ्यास करण्याची गरज डॉ गणेश देवी यांनी व्यक्त केली. भाषा, साहित्य व मानव्यविद्या शाखांमध्ये होणारे संशोधन हे या दर्जाचे असावे असेही ते म्हणाले.

मातृभाषेतील शिक्षण परिनामकारक
व्यक्तीने कुठल्या एका भाषेचा अभिनिवेश न ठेवता अधिकाधिक भाषा अवगत करण्यासाठी धडपड केली पाहिजे. कारण प्रत्येक नवी भाषा हा एक नवी सांस्कृतिक अवकाश दाखवणारा महत्त्वाचा बिंदू असतो. आपले चित्त व सभोवताली असलेल्या विश्वाला जोडणारा एकमेव सेतु म्हणजे भाषा आहे. मातृभाषेत दिलेले शिक्षण हे अधिक परिणामकारक असते व त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे डॉ. देवी म्हणाले.

in coming two hundred years all languages will be vanished says dr ganesh devi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com