मिलिंद देवरा भाजपच्या वाटेवर?; 'हाऊडी मोदी'चे तोंडभरून कौतुक

टीम ई-सकाळ
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

मुंबई : ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमावरून काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या वरच्या फळीतील आणि विशेष म्हणजे राहुल गांधी यांचे विश्वासू असलेल्या मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे

मुंबई : ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमावरून काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या वरच्या फळीतील आणि विशेष म्हणजे राहुल गांधी यांचे विश्वासू असलेल्या मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनीही त्यांचे आभार मानले आहे. पंतप्रधान मोदी आणि देवरा यांच्यात झालेल्या संवादाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

आता भाजपचे लक्ष्य समान नागरी कायदा?

अमेरिकेतील निवडणुका आणि ‘हाउडी मोदी’
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. काल अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ह्युस्टन शहरात ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनआरजी स्टेडियमवर झालेल्या या अभूतपूर्व सोहळ्याला जवळपास ५० हजारहून अधिक भारतीयांनी उपस्थितीत लावली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील पंतप्रधान मोदींसह व्यासपीठावर होते. एखाद्या भारतीय नेत्याचा परदेशातील व्यासपीठावर इतका मोठा सोहळा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण, अमेरिकेतील आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ट्रम्प यांचा हा खटाटोप होता, अशी टीका होऊ लागली आहे. काँग्रेसनेही हाच धागा पकडून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

मंदीत चांदी, गुंतवणूकदार दोन दिवसांत झाले मालामाल

काय म्हणाले देवरा?
दरम्यान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे कौतुक केले आहे. देवरा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हाउडी मोदी कार्यक्रमातील भाषण हे भारताच्या मुत्सद्दीपणासाठी महत्त्वाचे आहे. माझे वडील मुरली देवरा यांनी भारत-अमेरिका संबंधांची पायाभरणी केली होती. देवरा यांच्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिप्लाय दिला असून, दिवंगत मुरली देवरा यांनी दोन्ही देशांमधील संवाद वाढण्यात मोलाचा वाटा उचलला होता, असे म्हटले आहे. सध्याचे दोन्ही देशांमधील संबंध पाहून ते नक्कीच आनंदी झाले असते. त्याला पुन्हा देवरा यांनी ट्विट करून प्रतिसाद दिला आहे. देवरा यांनी म्हटले आहे की, मुरलीभाई कायम राष्ट्राला सर्वस्व मानून काम करत होते. भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल संबंध प्रस्थापित व्हावेत, यासाठी त्यांचे प्रयत्न होते.

सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ

देवरा-निरुपम मतभेद चव्हाट्यावर
लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद होते. निवडणुकीत मुंबईतील सहाही जागांवर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मिलिंद देवरा आणि काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांच्यातील मतभेदांचा फटका काँग्रेसला बसल्याची चर्चा आहे. पुढे राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, ‘पक्षात लोकं जबाबदारी घेत नाही’, अशी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. त्यात देवरा यांनीदेखील राजीनामा दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader milind deora appreciate pm modi howdy modi