esakal | वीज कंपन्यांकडून ग्राहक वेठीस, थकीत वीजबिल भरण्यासाठी नोटिसा आल्याने ग्राहक हतबल
sakal

बोलून बातमी शोधा

वीज कंपन्यांकडून ग्राहक वेठीस, थकीत वीजबिल भरण्यासाठी नोटिसा आल्याने ग्राहक हतबल

राज्य सरकारने वीज ग्राहकांना सवलत देण्यावरून यु टर्न घेतला आहे. त्यानंतर वीज वितरण कंपन्यांनी लॉकडाउनच्या काळातील भरमसाठ वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे.

वीज कंपन्यांकडून ग्राहक वेठीस, थकीत वीजबिल भरण्यासाठी नोटिसा आल्याने ग्राहक हतबल

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई, ता. 19 : राज्य सरकारने वीज ग्राहकांना सवलत देण्यावरून यु टर्न घेतला आहे. त्यानंतर वीज वितरण कंपन्यांनी लॉकडाउनच्या काळातील भरमसाठ वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. थकीत रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा कंपन्यांकडून देण्यात आला आल्याने ग्राहक हतबल झाले आहेत.

लॉकडाउनच्या कालावधीत वीज कंपन्यांनी ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठवले. भरमसाठ बिल पाहून अनेकांना शॉक बसला. बिलाची रक्कम करण्यासाठी ग्राहकांनी वीज वितरण कंपन्यांच्या कार्यालयाचे हेलपाटे मारले. मात्र वीजबिल योग्य असल्याने ते भरावेच लागेल असे कंपन्यांनी सांगितले. ग्राहकांवर ताण येऊ नये यासाठी कंपन्यांनी हप्त्यामध्ये रक्कम भरण्याचे आवाहन केले. मात्र लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा की भरमसाठ रक्कम भरायची या चिंतेत ग्राहक होते.

महत्त्वाची बातमी : "चायनीज हॉटेल्सचा चीनशी काय संबंध ? बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार?", संजय निरुपम यांनी उडवली सेनेची खिल्ली

ग्राहकांना दिलासा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यानंतर जागे झालेल्या सरकारने ग्राहकांना सवलत देण्याची घोषणा केली. यामुळे भरमसाठ वीज बिल आलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आर्थिक कारण देत सरकारने वीज बिलातून सवलत देण्याच्या भूमिकेवरून माघार घेतली आहे. त्यानंतर वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकांना थकीत रक्कम भरण्याची नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.

अदानी, महावितरण, टाटा आणि बेस्ट या कंपन्यांनी ग्राहकांना मोबाइलवर ऑक्टोबर महिन्यापर्यंतची थकीत रक्कम भरण्याची नोटीस पाठवली आहे. ग्राहकांनी थकीत रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा कंपन्यांनी दिला आहे. यामुळे ग्राहक हतबल झाले आहेत.

महत्त्वाची बातमी :  तुम्ही जिथे मोठ्या उत्साहाने जातात असे तब्बल 29 मॉल्स धोकादायक, संपूर्ण यादी वाचा आणि जायचं की नाही ते ठरवा

थकबाकीदार घरगुती ग्राहक

  • अदानी - 7 लाख 13 हजार 89 ग्राहकांकडे 385.09 कोटी थकीत रक्कम आहे.
  • बेस्ट - 1 लाख 20 हजार 436 ग्राहकांकडे 231 कोटी रक्कम थकीत आहे.
  • टाटा  - 1लाख 48 हजार 257 ग्राहकांकडे 56.7 कोटी रुपये थकीत आहेत.
  • महावितरण - महावितरणच्या 1 कोटी 34 लाख 52 हजार 314 ग्राहकांकडे 5003 कोटी रुपये थकीत आहेत.

सरकारने आश्वासन पाळावे : 

वीज वापर कमी असतानाही लॉकडाऊनमध्ये वीज बिल अधिक आले. सरकारने बिलामध्ये सवलत देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मी बिल भरले नाही. आता ही रक्कम 20 हजार रुपयांपर्यंत पोचली आहे. आता बेस्टने थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. एवढी रक्कम भरणे अवघड आहे. त्यामुळे सरकारने ग्राहकांना दिलेले आश्वासन पाळावे, असं बेस्ट ग्राहक सुरेंद्रकुमार कांबळे म्हणतात.

महत्त्वाची बातमी : भातखळकरांकडे मुंबईची जबाबदारी देऊन भाजपने आशिष शेलारांचे पंख छाटले ?

अवास्तव बिलातून सुटका हवी : 

लॉकडाऊन कालावधीत तब्बल ४३ हजाराचे बिल आहे. मला दरमहिन्याला हजार रुपयांपर्यंत बिल यायचे. सरकार बिल कमी करेल या विश्वासावर मी बिल भरले नाही. पण सरकाराने आता अंग काढून घेतल्याने आमच्यासारख्या लोकांनी काय करायचे. सरकारने बंगले, गाड्या यावर खर्च करत आहे. पण गोरगरिबांना दिलासा देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारने प्रसंगी कर्ज काढून ग्राहकांना दिलासा देऊन या अवास्तव बिलातून ग्राहकांची सुटका करायला हवी असेही बेस्ट ग्राहक शरद खैरमोडे म्हणतात. 

आश्वासन पाळा : 

तर अदानी ग्राहक श्रीधर कदम म्हणतात की, बिल भरमसाठ आले आहे. सरकारने वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन पाळावे. बिलाची रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गोरगरिबांना सरकारने वाऱ्यावर सोडू नये. वापरापेक्षा अधिक बिल येते. वीज कंपन्या गाऱ्हाणी ऐकत नाहीत.

महत्त्वाची बातमी :  ऑपरेशन कलॅप्सो फत्ते ! तीन कोटींच्या कोकेनसह ड्रग्स तस्करांची बडी टोळी DRI च्या अटकेत

सरकारने तातडीने दिलासा द्यावा : 

सरकारने आजवर कोणत्याही घटकाला दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सरकारने गरिबांचा आवाज ऐकून दिलासा द्यावा. मी बिल भरूनही पुन्हा भरमसाठ वीज बिल आलेले आहे. वीज बिलाचे गौडबंगाल कळेना झालेय. सरकारने तातडीने दिलासा द्यावाअसं बेस्ट ग्राहक सखाराम पाटील म्हणतात. 

( संपादन - सुमित बागुल )

Consumers are helpless due to notices from electricity companies to pay overdue electricity bills

loading image
go to top