कोरोना सुरक्षा सामग्री महागली, ग्राहकांची लूट,15 ते 20 टक्के किंमती वाढल्या

मिलिंद तांबे
Monday, 14 September 2020

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क, हँडग्लोव्ह, सॅनिटायझर, फेसशिल्डची मागणी वाढली आहे. वाढलेली मागणी लक्षात घेऊन दुकानदारांनी या वस्तू 15 ते 20 टक्के चढ्या किंमतीने विकण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई: कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क, हँडग्लोव्ह, सॅनिटायझर, फेसशिल्डची मागणी वाढली आहे. वाढलेली मागणी लक्षात घेऊन दुकानदारांनी या वस्तू 15 ते 20 टक्के चढ्या किंमतीने विकण्यास सुरूवात केली आहे. पुरवठा कमी असल्याने किंमती वाढल्याचे काही दुकानदार सांगत असले तरी त्यात फारसे तथ्य नसल्याचे ऑल इंडिया फूड एंड ड्रग्स लायसेंस होल्डर असोसिएशनचे म्हणणे आहे.

मास्कची जोडी 10 ते 12 रूपयांना मिळत होती ती आता 20 ते 25 रूपयांना विकली जातेय. हँडग्लोव्हजच्या किंमत 10 रुपयांवरून 20 ते 25 रूपये झाली आहे. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी फेसशिल्डची मागणी ही वाढली आहे. एक फेसशिल्ड 50 रूपयांना मिळत होते त्याची किंमत वाढवून आता ते 100 ते 150 रूपयांना विकले जातेय.

कोरोनामुळे वैद्यकीय सामग्रीच्या मागणीत वाढ होणार हे स्पष्ट होते. या सामग्रींच्या किंमती हाताबाहेर जाऊ नयेत यासाठी सुरूवातीला अन्न व औषध प्रशासनाने मास्क आणि सॅनिटायझरसारखी उत्पादनांचा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला होता. तो पर्यंत या वस्तूंच्या किंमती नियंत्रणात होत्या. आता या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून का हटवल्या असा प्रश्न ऑल इंडिया फूड एँड लायसेंस होल्डर असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी उपस्थित केला आहे. 

अधिक वाचाः  नीट परीक्षार्थिंना गलथाल कारभाराचा फटका; अचानक परिक्षाकेंद्र बदलल्याने विद्यार्थी- पालकांना मानसिक त्रास

देशात मुबलक प्रमाणात कच्चा माल उपलब्ध आहे. कच्च्या मालाचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसताना देखील तसे भासवून ग्राहकांची लूट सुरू असल्याचे पांडे पुढे म्हणाले. याबाबत आपण अन्न व औषध प्रशासनाला पत्र लिहून किंमती नियंत्रित करण्याची मागणी केली असल्याचे ही पांडे यांनी सांगितले. 

हेही वाचाः  नवी मुंबईत साथीचे रोग आटोक्यात; डेंगीचा एकही रुग्ण नाही; नागरिकांचे प्रबोधन केल्याचा परिणाम

कोरोनामुळे मास्क,सॅनिटायझरपासून ऑक्सिमीटर, थर्मामीटर, फेसशिल्डच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. यातील काही वस्तूंच्या किंमतींमध्ये फरक जाणवत असला तरी अनेक वस्तू स्वस्त ही झाल्या आहेत. यातील अनेक वस्तू एमआरपीने विकल्या जात नसल्यानं वेगवेगळ्या परिसरात एकाच वस्तूच्या किंमतीत फरक दिसतो असे दी रिटेल एँड डिस्पेंसिव्ह केमिस्ट असेसिएशनचे अध्यक्ष प्रसाद दानवे यांनी सांगितले.  मात्र गेल्या चार महिन्यांच्या तुलनेत अनेक वस्तू स्वस्त झाल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Corona security materials became more expensive prices rise 15 20 percent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona security materials became more expensive prices rise 15 20 percent