...ती चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

शनिवारी (ता.21) कामतघर परिसरातील अंजूरफाटा भागातील एका इमारतीमध्ये ऑस्ट्रेलिया येथून दोन महिला आल्याची चित्रफीत समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रसारित झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. 

भिवंडी : भिवंडी शहरात परदेशातून परतलेल्या नागरिकांची पालिकेच्या विशेष वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, शनिवारी (ता.21) कामतघर परिसरातील अंजूरफाटा भागातील एका इमारतीमध्ये ऑस्ट्रेलिया येथून दोन महिला आल्याची चित्रफीत समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रसारित झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. 

ही बातमी वाचली का? ठाणे ग्रामीण भागात सर्र्वत्र शुकशुकाट 

पालिकेच्या वतीने ही मोहीम अत्यंत गोपनीय पद्धतीने राबविण्यात येत असून, त्यास पोलिस प्रशासनाचेही सहकार्य मिळत आहे. ऑस्ट्रेलियातून आलेल्या दोन महिलांची चित्रफीत समोर आल्यानंतर पोलिस व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांची चौकशी करून तपासणी केली. याशिवाय अशोकनगर येथे लंडनहून परतलेल्या प्रवाशांची तपासणी करून, त्यांनाही घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला. चुकीची चित्रफीत काढून ती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, नागरिकांनी कोरोनाबाबत काळजी घ्यावी, अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय सेवा आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. जयवंत धुळे यांनी केले आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईकरांचे भविष्य त्या 402 प्रवाशांच्या हाती

समाजमाध्यमांवर पसरलेला संदेश 
परदेशातून परतलेले भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात आले आहेत. त्यांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांना प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले असून, खबरदारी म्हणून चौदा दिवस "होम क्वारंटाईन' करून राहावे, असा शिक्का त्यांच्या हातावर मारण्यात आला आहे. अशी माहिती समाजमाध्यमांवर काल सायंकाळी प्रसिद्ध झाली. त्यामुळे भिवंडीत खळबळ उडाली होती. 

ही बातमी वाचली का? ठाण्यात निरव शांतता

परदेशी प्रवास करून आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती महापालिकेचा आरोग्य विभाग घेत असून, अशा व्यक्तींना "होम क्वारंटाईन' होण्याचा सल्ला दिला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. 
- डॉ. जयवंत धुळे, आरोग्य विभाग, भिवंडी महापालिका. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona suspects video viral on social media bhiwandi