esakal | ठाण्यात निरव शांतता
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कर्फ्यूचे "ठाणे'; रविवारी कडकडीत बंद

ठाण्यात निरव शांतता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संचारबंदीच्या आवाहनाला ठाण्यात रविवारी (ता. 22) सर्वत्र 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी पहाटेपासूनच संपूर्ण शहर परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे रविवारी ठाणे शहर कर्फ्यूचे "ठाणे' बनले होते. इतिहासात नोंद व्हावी, अशी शांतता सगळीकडे होती.

महाविद्यालयाची वसतिगृहे 'क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू

ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानकासह जुना मुंबई-पुणे आग्रा रोड, मुंबई-नाशिक महामार्ग, भिवंडी बायपास, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि प्रशस्त अशा घोडबंदर रोडवर एकही वाहन नव्हते; तर जुने ठाणे असलेला नौपाडा, राम मारुती रोड, बाजारपेठ, मंडई, पाचपाखाडी, वागळे इस्टेट, वर्तकनगर, उपवन, घोडबंदर रोड परिसरातील उच्चभ्रू गृहसंकुले यांसह कळवा, मुंब्रा आदी उपनगरे रविवारी ओस पडल्याचे दिसून आले.

रक्षकच बनताय कोरोनाचे भक्षक

हॉर्नविरहीत ठाण्याची अनुभूती 
पेट्रोल पंप, एसटी डेपो, सॅटीसवरील टीएमटी स्थानकदेखील बंद होते. त्यामुळे आज एकही नागरिक घराबाहेर पडला नाही; किंबहुना कुणीही रस्त्यावर वाहन घेऊन उतरला नसल्याने प्रथमच हॉर्नविरहीत ठाणे नगरी अनुभवता आली. पहाटे काही काळासाठी वृत्तपत्र विक्री, दूध डेअरी आणि ठाणे महापालिकेचे सफाई कर्मचारी यांसारख्या अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या. सकाळी 7 वाजल्यानंतर हेदेखील लॉकडाऊन झाल्याने आज शंभर टक्के बंदची प्रचिती आली. सर्वत्र पोलिस, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वगळता रस्ते निर्मनुष्य होते. 

दहावीचा शेवटचा पेपर ढकलला पुढे, आता परीक्षा होणार 'या' तारखेनंतर

सार्वजनिक वाहतूक विरळच 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी प्रथमच मोठा निर्णय घेत लोकल (उपनगरी) सेवेवर निर्बंध लावले. सर्वसामान्य प्रवाशांवर निर्बंध आणून केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी व मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांना ओळखपत्र व पुरावे पडताळणी करून सोडले जात होते. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकात शुकशुकाट दिसून आला. ठाणे स्थानकात यासाठी ठाणे महापालिका आरोग्य कर्मचारी, लोहमार्ग पोलिस, आरपीएफ जवान तैनात केले होते. प्रत्येक प्रवाशाची तपासणी व कागदपत्रे पडताळूनच प्रवासाची अनुमती दिली जात होती. शिवाय लांब पल्ल्याच्या वाहनांमधून आलेल्या प्रवाशांचे नाव, फोन नंबर व पत्ता आदींची नोंद घेतली जात होती. 

महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

टीएमटीची सेवा सकाळनंतर बंद! 
संशयित प्रवाशांची रवानगी सिव्हिल रुग्णालयात करण्यात आली; तर एसटीची एकही बस न धावल्याने ठाणे स्थानक एसटी डेपो, वंदना बसस्थानक व खोपट स्थानकावर शुकशुकाट होता. पहाटे काही अंशी सुरू करण्यात आलेली ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची (टीएमटी) बससेवा सकाळनंतर पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला. मात्र प्रवाशांची मागणी आल्यास आवश्‍यकतेनुसार बस सेवा सुरू करण्यात येईल, असे परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी स्पष्ट केले. 

अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...

शहरात औषधफवारणी 
कोरोनाच्या धास्तीने शहरात साथीच्या आजार डोके वर काढण्याची शक्‍यता बळावली आहे. त्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच, दूषित पाणी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंगी, लेप्टो व मलेरियासह काविळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कर्फ्यूचा लाभ उठवत शहरातील गटारे व गलिच्छ परिसरात औषधफवारणी केली. 

भिंतीवर लिहिली बायकोच्या प्रियकराची माहिती, पण त्या आधीच त्यानं तिला...

कर्फ्यूच्या पूर्वसंध्येला चिकन-मटण तेजीत 
कर्फ्यूच्या पूर्वसंध्येलाच नागरिकांनी आपल्या पोटापाण्याची बेगमी करून ठेवली. कर्फ्यू रविवारी असल्याने अनेकांनी सामिष भोजनाचे बेत आखून शनिवारीच चिकन-मटण खरेदी केले. एकाच वेळी ग्राहकांची झुंबड उडाल्याने चिकन 280 रुपये प्रतिकिलो; तर मटणाचे दर 750 रुपये किलो झाले होते. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ठाण्याच्या बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ सुरूच असल्याचे चिकन-मटण विक्रेत्यांनी सांगितले.

Sunday closed tight in Thane

loading image