टायफॉईड लसीकरण मोहिमेत भ्रष्टाचार?

टायफॉईड लसीकरण मोहिमेत भ्रष्टाचार?
टायफॉईड लसीकरण मोहिमेत भ्रष्टाचार?

नवी मुंबई : 2018-19 या वर्षात टायफॉईड लसीकरण शहरातील विविध भागांत राबवण्यात आले, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते; मात्र यासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे व पुरावे मागणी करूनही मिळत नाहीत. याउलट उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. विशेष म्हणजे शहरात दोन आकडी संख्येइतकेदेखील टायफॉईडचे रुग्ण नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या केलेल्या सात कोटी रुपयांच्या फसवणुकीची चौकशी करून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नवी मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते वैभव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केल्याप्रमाणे 2017 मध्ये राज्य सरकारने तत्कालीन आयुक्त एन. रामास्वामी यांना लसीकरण मोहीम राबवण्याचे आदेश दिले. यासाठी पालिकेच्या वतीने मे. भारत बायोटेक या कंपनीला कंत्राट देण्यात आले; मात्र याबाबत कोणतीही निविदा न काढता हे काम दिले गेले. त्यामुळे या लसीकरण मोहिमेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे वैभव सावंत यांनी म्हटले आहे. कंपनीकडून पूर्ण प्रकल्पाकरिता चार लाख डोस अपेक्षित होते. त्यापैकी एक लाख डोस उत्पादक मोफत पुरवणार होते; तर उरलेल्या तीन लाख डोससाठी सव्वासहा कोटी रुपये खर्च येणार होता. म्हणजेच एका डोससाठी कंपनी 200 रुपये आकारणार होती; तर मोहीम राबवण्यासाठी 70 लाख रुपये खर्च करण्यात येणार होता. पहिल्या टप्प्यात कंपनीकडून 1,13,420 डोस दिले गेले. त्यात 50 हजार डोस मोफत दिले असून, एक कोटी 74 लाख रुपये कंपनीला पालिकेकडून अदादेखील करण्यात आले आहेत; मात्र त्यानंतरही मोहीम राबवण्यात आली नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनर्जीत चव्हाण यांनी अनेकदा पत्रव्यवहार केले, परंतु त्यांच्या हाती काहीही सापडले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

रुग्णसंख्येत मोठी घट 
नवी मुंबईत 2003 ते 2017 या 15 वर्षांच्या कालावधीत टायफॉईडचे एक हजार 227 रुग्ण होते; तर 2018 मध्ये एकआकडी म्हणजे फक्त सहा रुग्ण आढळले होते. 

टायफॉईड लसीकरण योजना राबवण्यात आली नाही. जर ती राबवण्यात आली असती, तर रुबेला मोहिमेसारखे पुरावे मिळाले असते, परंतु योजनेत कोणताही योग्य पुरावा दाखवण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. 
- वैभव सावंत, प्रवक्ता, नवी मुंबई कॉंग्रेस

आपण पालिका प्रशासनात रुजू होण्याच्या अगोदरचा हा विषय आहे. याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. 
- बाळासाहेब सोनावणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com