Video : हॅलो ठाणे महापौर, डोंगरीमधून दाऊदचा माणूस बोलतोय!

दीपक शेलार
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने महापौरांना मोबाईलवर आलेल्या धमकीच्या फोनने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाणे : ''मुंबईतील डोंगरी येथून दाऊदचा माणूस बोलतोय. तुम्ही ठाण्यात खूप भांडणे करता, व्यवस्थित राहत नाही. तुम्ही नीट राहिला नाहीत, तर तुम्हाला उचलून नेऊन तुमच्या कुटुंबीयांना त्रास देऊ. तुम्ही तुमच्या हिशोबात राहा,'' असा धमकीचा फोन महापौर मीनाक्षी शिंदे याना मंगळवारी (ता.17) रात्री आला. याप्रकरणी महापौर शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदविली असून कापूरबावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- देशभरात ई-सिगारेटवर बंदी; केंद्राचा निर्णय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने महापौरांना मोबाईलवर आलेल्या धमकीच्या फोनने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात कुणालाही न जुमानता विकासाच्या आणि ठाणेकरांच्या हितासाठी ठोस निर्णय घेतले. प्रसंगी प्रशासनाशी दोन हात करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे महापौर शिंदे यांची प्रतिमा डॅशिंग महापौर अशी बनली आहे.

दरम्यान, त्यांनी ही बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाफील राहू नका, असा सल्ला दिल्याने महापौरांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सदरचा मोबाईल नंबर ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- मंत्रालयात दोघा शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न​

मंगळवारी रात्री हा फोन आला. आज पुरुषार्थ संपत चालल्याचे दिसत आहे. माझ्यासारख्या महिला महापौराला दाऊद किंवा छोटा शकीलचे हस्तक धमकावतात, ही निंदनीय बाब आहे. मी कुणाला घाबरत नाही. दाऊदच्या हस्तकांमध्ये हिंमत असेल, तर त्याने समोर येऊन धमकी द्यावी. मी महापौर म्हणून निर्भिडतेने काम करत आहे. माझे कुणाशीही वैर झाल्याचे मला आठवत नाही. पोलीस त्यांच्यादृष्टीने तपास करीत आहेत.
- मीनाक्षी शिंदे (महापौर, ठाणे)

राणेजी, भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही, दिल्लीतून ठरतो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dawood Ibrahims handler threatens Thane mayor over phone