'माझाही धनंजय मुंडे झाला असता'; भाजपच्या नेत्यानंतर मनसे नेत्यानेही केला खुलासा

टीम ई सकाळ
Thursday, 14 January 2021

धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात भाजप नेत्याने तक्रार केल्यानंतर आता मनसे नेत्यानेही याच महिलेनं आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा खुलासा केला आहे. 

मुंबई - धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात भाजप नेत्याने तक्रार केल्यानंतर आता मनसे नेत्यानेही याच महिलेनं आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा खुलासा केला आहे.  मनसेचे नेते मनीष धुरी यांनी म्हटलं की, मलाही याच महिलेनं हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर महिलेनं आरोप केल्यानंतर आतापर्यंत दोन नेत्यांनी संबंधित महिलेबद्दल खुलासा हेगडे यांच्याकडे केला आहे.

भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी संबंधित महिलेविरोधात पोलिसात तक्रात दाखल केली आहे. त्यानंतर बोलताना त्यांनी म्हटलं की, धनंजय मुंडे यांचे या प्रकरणात नाव आले. त्याआधी माझंही नाव आलं असतं. पण वेळीच सावध झाल्यानं तसं होऊ शकलं नाही. याशिवाय इतरांचीही नावे येऊ शकतात असं मी सांगितलं होतं. त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांचा मला कॉल आला आणि त्यांनीही म्हटलं की, माझ्या बाबतीतही संबंधित महिलेनं हेच केलं. 

हे वाचा - धनंजय मुंडे प्रकरणात भाजपची गोची; आरोपांची धार कमी होणार?

मनसे नेते मनीष धुरी यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितलं की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेनं माझाही नंबर कुणाकडून तरी घेतला होता आणि ती मला फॉलो करत होती. अनेकवेळा तिने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मोठ्या लोकांना हेरण्याचा प्रयत्न ती करत असल्याचं कळाल्यानं मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. एक दीड वर्षापूर्वी ती महिला पुन्हा माझ्या संपर्कात आली होती. मी अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता असंही मनीष धुरी म्हणाले.  

हे वाचा - धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का ? जयंत पाटील यांनी गोष्टी केल्यात क्लियर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay munde aligations now mns leader manish dhuri reveal about her