लॉकडाऊनमध्ये प्रेग्नन्सीचा विचार करताय? आधी हे वाचा, मग काय ते ठरावा...

मयुरी चव्हाण काकडे
Sunday, 26 April 2020

गर्भातील बाळाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने पुढील धोका लक्षात घेऊन भविष्यात माता होऊ पाहणाऱ्या महिलांना तूर्तास गर्भधारणा टाळण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे

कल्याण : प्रत्येक स्त्रीसाठी आई होणे ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट असते. मात्र सध्या या कोरोनाच्या संकटात काही काळ तरी महिलांना या आनंदापासून मुकावे लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत गर्भधारणा ठेवावी की नाही ?  याबाबत सल्ला घेण्यासाठी अनेक महिला स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधत आहे. दरम्यान, गर्भातील बाळाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने पुढील धोका लक्षात घेऊन भविष्यात माता होऊ पाहणाऱ्या महिलांना तूर्तास गर्भधारणा टाळण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे. 

महत्वाची बातमी ः काय सांगता ! 'सिगारेट' ओढल्याने कोरोनाचा धोका कमी? वाचा कोणी केलाय हा दावा

कोणत्याही प्रकारच्या साथीच्या रोगांमध्ये गरोदर माता हा जोखमीचा गट असतो. अलीकडेच कोरोनाचे कोणतेही लक्षण नसलेल्या व्यक्तींचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गर्भवती स्त्रियांचाही समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जन्मलेल्या बाळाला संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अत्यावश्यक असणाऱ्या स्तनपानात अडथळे येऊन बाळाची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. या सर्वांमुळे सध्या गर्भवती असलेल्या स्त्रिया मानसिक तणावाखाली आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन भविष्यात आई होऊ इच्छिणाऱ्या अनेक महिला गर्भाधारणेविषयी डॉक्टरांशी सल्लामसलत करत आहेत. दरम्यान, जन्माला येणारे बाळ जन्मतः सुदृढ असावे, असा विचार करत भावी मातांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत गर्भधारणा टाळावी, असा सल्ला स्त्रीरोगतज्ञ देत आहेत.

मोठी बातमी ः 3 मे नंतरची परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनबाबत निर्णय : मुख्यमंत्री

ग्रामीण भागांत जनजागृती महत्त्वाची 
सध्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सुशिक्षित कुटूंबातील स्त्रिया गर्भधारणे विषयी स्त्रीरोगतज्ञांकडून सल्ले घेऊन योग्य निर्णय घेत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील स्त्रिया, अशिक्षित कुटुंबांना आरोग्याविषयीच फारशी जाण नसल्याने सुखी व सुरक्षित मातृत्वाबद्दल त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे झाले आहे. 

हे वाचा ः कौतुकास्पद ! धकधकता वणवा विझवण्यासाठी दोन तरुणांचं धाडस, वाचा चित्तथरारक अनुभव

गर्भवतींना कोरोनाचा धोका अधिक
वयाच्या तिशीनंतर होणाऱ्या प्रसूतीमधील अडथळे,  उच्च रक्तदाब, मधुमेह व थायरॉईड यासारखे महिलांना असलेल्या आजारामुळे आधीच प्रसूतीत धोका असतो. तर काही महिलांना गर्भधारणेच्या कालावधीपुरते हे आजार आणखी बळावतात. त्यात कोरोना सारख्या संसर्गाची भर पडली तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. डायबेटीस आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग लगेच होतो हे आजवरील अनेक उदाहरणावरूनही पुढे आले आहे. त्यामुळे गर्भवती महिलांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे समोर येत आहे. 

हे वाचलं का ः आयडियाची कल्पना! लॉकडाऊनमध्येही त्याने केला मुंबई ते अलाहाबाद प्रवास

कोरोनाचे संकट टळल्यावर आई होणार!
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मदतीने `सकाळ`ने काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, असता तणावाच्या वातावरणात गर्भधारणा ठेवणे योग्य नसून कोरोनाचे संकट टळल्यावरच आनंदी वातावरणात सुदृढ बालकाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्याचे काही महिलांनी नाव न छापण्याच्या अटी सांगितले. 

अनेक महिला गर्भधारणा ठेवण्याबाबत फोन करून सल्ला घेत आहे. भविष्यातील सर्व धोके व आताची परिस्थिती याबाबत माहिती देऊन "तूर्तास गर्भधारणा टाळाच" असा स्पष्ट सल्ला आम्ही देत आहोत. गर्भधारणेत अनेकदा नाजूक प्रसंग येतात अशा वेळी घराबाहेर सारखे पडणेही योग्य नाही.  
- डॉ. प्रकाश राठोड, स्त्रीरोगतज्ज्ञ, बदलापूर. 

आईला कोरोनाची लागण झाली असली तरी बाळ हे कोरोना निगेटिव्ह असल्याच्याही केसेस माझ्या पाहणीत आहे. मात्र एकंदरीत स्थिती लक्षात घेता गर्भधारणा टाळणे हाच पर्याय उत्तम आहे.  
- डॉ. सादिया पिंजारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, भिवंडी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors says that pregnancy in corona period may be harmful