डोंबिवली : पाथर्ली गॅस शवदाहिनीत उडाला भडका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : पाथर्ली गॅस शवदाहिनीत उडाला भडका

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : गॅस शवदाहिनीत अंतिम संस्कार सुरू असतानाच आगीचा भडका उडाल्याने कंत्राटी कर्मचारी भाजल्याची घटना डोंबिवली पाथर्ली येथील स्मशानभूमीत शनिवारी रात्री घडली. जखमी कर्मचाऱ्याला त्वरित उपचार मिळावे म्हणूम येथील नागरिकांनी रुग्णवाहिकेला फोन केला. तास उलटूनही वाहिका न आल्याने नागरिकांनी त्याला रिक्षातून पालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णाला कळवा किंवा मुंब्रा हलविण्यास सांगण्यात आले. यामुळे रुग्ण कर्मचाऱ्याची हेळसांड झाली.

डोंबिवलीतील पाथर्ली येथील स्मशानभूमीत शनिवारी रात्री एका महिलेवर गॅस शवदाहिनीत अंतिम संस्कार करण्यात येत होते. 10.30 च्या सुमारास गॅस शव दाहिनीत अचानक आगीचा भडका उडाला. या भडक्यात कंत्राटी कर्मचारी गोपाळ अडसूळ यांचा चेहरा भाजला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अंतिम संस्कारासाठी जमलेले नागरिक यांचीही पळापळ झाली. मात्र प्रसंगावधान राखीत काही नागरिकांनी रुग्णवाहिकेसाठी 108 वर कॉल केला. त्यानंतर 100 नंबरवही कॉल केले. मात्र तासभर उलटूनही रुग्णवाहिका आलीच नाही अखेर जखमी गोपाल यांना रिक्षात घेऊन शास्त्रीनगर रुग्णलय गाठले. त्याठीकाणी तज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णालयातून त्यांना कळवा येथे नेण्यास सांगितले.

हेही वाचा: रामदास आठवलेंनी पिचडांच्या कानात काय सांगितले? चर्चेला उधाण

याविषयी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कळविले.मात्र अधिकाऱ्यानी देखील हतबलता स्पष्ट केल्याचे ठोके यांनी सांगितले. बऱ्याच वेळेनंतर पोलीस प्रशासन तेथे आले. त्यानंतर गोपाळ यांना मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे ठोके यांनी सांगितले.

गॅस शव दाहिनीचे बटन व लायटर यामध्ये गेले 10 दिवस झाले बिघाड झालेला आहे. याविषयी वरती कळविण्यात आले आहे. या बिघाडामुळे ही घटना घडली असावी असे येथील मशीन ऑपरेटर अनिल जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा: नापास 51 डाटा ऑपरेटर घरी ! लिपिकांना परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय वेतनवाढ नाही; सातव्या वेतन आयोगाचाही पेच 

या घटनेमुळे पालिका रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची कमतरता यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड पुन्हा एकदा समोर आली आहे. पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने कधी पाहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

loading image
go to top