#HopeOfLife : नियमित आरोग्य तपासणी गरजेची!

cancer
cancer

सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामागची कारणे काय असू शकतात?
उत्तर
 : पहिली गोष्ट म्हणजे कर्करोगाचे प्रमाण का व कसे वाढले हे लक्षात घ्यायला पाहिजे. पूर्वी भारतातील लोकांची आयुमर्यादा ५० ते ६० वर्षे इतकीच होती. आता मात्र वैद्यकीय सुविधांच्या उपलब्धतेमुळे आणि जनजागृतीमुळे भारतीय लोकांची सरासरी आयुमर्यादा ८० वर्षांच्या पुढे गेली आहे. तसेच पूर्वी अनेक जण गंभीर आजार झाल्यास उपचार करण्याऐवजी गावातीलच वैद्यांकडून उपचार करून घेत असत. त्यामुळे त्यातून होणाऱ्या मृत्यूंची नोंद नेमकी कोणत्या आजाराने झाली, हे कळत नव्हते. आता मात्र वाढत्या जनजागृतीमुळे अगदी दुर्गम भागातील लोकही उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे अधिक रुग्ण रुग्णालयांमध्ये येत असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे एखादा रुग्ण पहिल्यांदा एका डॉक्‍टरकडे जातो. तेथे उपचार घेऊनही बरे न वाटल्यास तो रुग्ण दुसऱ्या डॉक्‍टरांकडे जातो. या प्रमाणे जर एकच रुग्ण तीन-चार डॉक्‍टरांकडे जात असल्यानेही रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. कर्करोगाच्या रुग्णांच्या वाढलेल्या संख्येपेक्षा अधिकाधिक रुग्ण रुग्णालयापर्यंत येत आहेत, ही सकारात्मक बाब म्हणायला हवी.

कर्करोग होण्यामागे जनुकीय कारणे असू शकतात का? असेल तर ती कशी?
उत्तर :
 केवळ कर्करोगच नव्हे तर याशिवाय अन्य आजारांमागेही जनुकीय कारणे असतात. जनुकीय विकार होण्यामागील कारणे म्हणजे शरीरातील जणुकीय संरचनेमध्ये होणारा बिघाड. पहिल्या प्रश्‍नाच्या उत्तरात म्हटल्याप्रमाणे मनुष्याची सरासरी आयुमर्यादा वाढल्याने शरीरातील पेशींची संरचना वाढत्या वयानुसार बिघडत जाते. त्यामुळे वाढत्या वयासोबत वेगवेगळ्या आजारांची लागण होते. त्याशिवाय नातेसंबंधात लग्न झाल्याने त्यातून होणाऱ्या अपत्यांमधील जनुकीय संरचना विस्कळित असते. तसेच ही अपत्यांमध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होण्याची शक्‍यता असते. तसेच त्यामुळे लहान मुलांमध्ये रक्ताचा, हाडाचा कर्करोग होतो. लहान मुलांमधील कर्करोगामागे शक्‍यतो जनुकीय कारणे आहेत. त्यामुळे शक्‍यतो नातेसंबंधांत लग्न करू नये. 

कर्करोगावरील प्रमुख उपचारांपैकी एक म्हणजे शस्त्रक्रिया. सध्या शस्त्रक्रियांमध्ये नव्या पद्धती कोणत्या? 
उत्तर :
 कर्करोगावरील उपचारांमध्ये शस्त्रक्रियेव्यतिरिक्त केमोथेरपी, रेडिएशन तसेच अन्य उपचारपद्धतींचाही वापर केला जातो. कर्करोगावरील शस्त्रक्रिया प्रामुख्याने ‘सॉलिड ट्युमर सेल्स’ म्हणजे गाठ असेल तरच केली जाते. कर्करोगाची गाठ काढण्यासाठी पूर्वी पारंपरिक शस्त्रक्रिया केली जायची. म्हणजे चिरफाड केली जायची. आता मात्र शस्त्रक्रियांच्या आधुनिक पद्धती उपलब्ध झाल्या आहेत. कमीत कमी शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक्‍स, लेझर, दुर्बीण पद्धतीचा वापर केला जातो. तसेच स्तनाचा कर्करोग झाल्यास पूर्वी संपूर्ण स्तनच काढून टाकावे लागायचे. आता मात्र स्तनातून केवळ कर्करोगाची गाठ काढून प्लास्टिक सर्जरीद्वारे स्तन पूर्वीप्रमाणेच कायम ठेवता येते.

अनेकदा कर्करोगाचे निदान व्हायला फार उशीर झालेला असतो. म्हणून निदान लवकर व्हावे म्हणून काय केले पाहिजे?
उत्तर :
 साधारणपणे कर्करोगाचे प्रमाण ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त आहे. तसेच आजकाल तरुणांमध्येही कर्करोग दिसून येत आहे. कर्करोग नेमका कशामुळे होतो, यापेक्षा तो झाला की नाही हे माहिती होणे आज अधिक महत्त्वाचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने वर्षातून संपूर्ण ‘बॉडी चेकअप’ करणे गरजेचे आहे. अनेक रुग्णालयांत ही तपासणी उपलब्ध असते. त्यामध्ये ट्युमर मार्कर, केमिकल मार्कर, अंडाशयाची सीए-१२५ तपासणी, सोनोग्राफी, थुंकी-मल-मूत्र तपासणी, मेमोग्राफी, सर्व्हायकल पॅप्स आदी चाचण्या केल्या तरी कर्करोगाचे निदान करता येते. सामान्यपणे अनेक दिवस खोकला बसत नसल्यास एक्‍स-रे काढला जातो. त्यात काही गाठ वगैरे आढळल्यास सीटी-स्कॅन करून ती कर्करोगाची गाठ असल्याचे निश्‍चित करता येते. 

आतापर्यंत तुम्ही कर्करोगाच्या अनेक शस्त्रक्रिया केल्या असतील, त्यापैकी लक्षात राहिलेल्या शस्त्रक्रियेबाबत काय सांगणार?
उत्तर :
 अनेकदा रुग्णांमध्ये असा गैरसमज असतो की, कर्करोगाची शस्त्रक्रिया केल्यास संबंधित अवयव काढून टाकला जाईल. त्यामुळे आपल्या शरीराची ठेवण बिघडण्याची भीतीही रुग्णांकडून व्यक्त केली जाते. मात्र आता तसे होत नाही. आधुनिक पद्धतींमुळे शरीराची ठेवण न बिघडवता शस्त्रक्रिया केली जाते. सामान्यपणे तोंडाचा कर्करोग आणि स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया केल्यावर शरीराची ठेवण बिघडू न देण्याची काळजी घेतली जाते. माझ्याकडे आलेल्या एका रुग्णाला गुदाशयाचा कर्करोग झाला होता. एका रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्‍टरांनी त्यांना गुदद्वारासह संपूर्ण गुदाशय काढून पोटाजवळ कृत्रिम उत्सर्जन प्रणाली लावण्याचा सल्ला दिला. मात्र या विचित्र शस्त्रक्रियेला संबंधित रुग्णाची आणि नातेवाईकाची संमती नव्हती. त्या रुग्णाला घेऊन त्याचे नातेवाईक माझ्याकडे आले. त्या रुग्णाची तपासणी केल्यावर कर्करोगाची लागण गुदद्वाराला झाली नव्हती. त्यामुळे ते काढण्याची गरज नव्हती. गुदद्वार सोडून बाधित झालेला भाग काढून टाकण्यात आला. आता तो रुग्ण नैसर्गिक पद्धतीने शौच करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com