#HopeOfLife : "कार टी सेल्स' ठरणार कर्करोग्रस्तांना संजीवनी! 

#HopeOfLife : "कार टी सेल्स' ठरणार कर्करोग्रस्तांना संजीवनी! 

कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढण्यासाठी भारतीय संशोधकांनी "कार टी सेल्स' या नव्या उपचार पद्धतीचा शोध घेतला आहे. पारंपरिक उपचार पद्धतीच्या तुलनेने तिचा खर्च कमी असणार आहे. हा प्रयोग कर्करोगग्रस्त उंदरांवर यशस्वी झाला असून मानवी शरीरावर प्रयोग करण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. "आयआयटी बॉम्बे'च्या बायोसायन्स आणि बायोइंजिनिअरिंग विभागातील प्रा. राहुल पुरवार आणि त्यांचे पथक यावर संशोधन करीत आहेत. त्यात यश मिळाल्यास कर्करोग रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे. 

प्रा. पुरवार यांनी कर्करोगाच्या विरोधात लढणाऱ्या पेशींची निर्मिती केली आहे. कर्करोगाशी लढण्यासाठी केमोथेरपीसारख्या पारंपरिक उपचारपद्धतींत औषधांच्या माऱ्यामुळे रुग्णांना मोठ्या वेदनांना सामोरे जावे लागते. तसेच, या उपचारामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे "कार टी सेल्स'चा प्रयोग समोर आला आहे. सर्वसाधारणपणे रोगप्रतिकारक पेशी या कर्करोगाच्या पेशींना ओळखू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना नष्ट करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे शरीरात कर्करोग बळावत जातो. कार टी सेल्स उपचार पद्धतीत या रोगप्रतिकारक पेशींना कर्करोगाच्या पेशी ओळखण्याइतपत सक्षम बनवले जाते. म्हणजेच, या उपचारपद्धतीत रुग्णाच्या शरीरातील रक्ताच्या माध्यमातून पेशी काढल्या जातात. या पेशींमधून विशिष्ट प्रकारच्या "टी पेशी' वेगळ्या केल्या जातात. कारण, सर्वच पेशींवर जनुकीय प्रयोग शक्‍य नाही. त्याकरता विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या पेशींवरच हा प्रयोग केला जाऊ शकतो. 

या टी पेशी वेगळ्या केल्यानंतर प्रयोगशाळेत जनुकीय बदल केले जातात. या प्रयोगातील सर्वांत आव्हानात्मक काम हेच आहे. कारण, मानवी शरीराबाहेर काढलेल्या पेशींना कृत्रिमरीत्या वाढवणे अवघड असते. पेशींना मानवी शरीरात मिळते त्याच प्रकारचे अन्न आणि वातावरणाची निर्मिती करावी लागते. या पेशींना जनुकीय अभियांत्रिकीद्वारे आणखी सक्षम बनवले जाते. त्यांना कर्करोगाच्या पेशींना ओळखण्याचे बळ दिले जाते. जनुकीय बदल करून तयार केलेल्या "कार टी' पेशी या कर्करोगाच्या पेशींना अचूक ओळखून त्यांना नष्ट करू शकतात. जनुकीय बदल केलेल्या कार टी पेशी पुन्हा मानवी शरीरात सोडल्या जातात. एक पेशी साधारण 40 ते 50 दिवस शरीरात राहते, तर या पेशींपासून पुनर्निर्मिती सुरू राहत असल्याने शरीरात त्यांची संख्या वाढत जाते. या कार टी पेशी शरीरातील कर्करोगाच्या पेशींना नष्ट करतात. या प्रयोगालाच "कार टी सेल्स थेरपी' असे म्हणतात. 

#HopeOfLife : कर्करोगाच्या निदानासाठी प्रशासनाने उचलंल महत्वाचं पाऊल

उपचाराचा खर्च कमी होणार 
कर्करुग्णांवर सध्या केमोथेरपीचे प्रयोग अधिक केले जातात. त्यासाठी सुमारे 25 ते 30 लाखांपर्यंत खर्च येतो. परंतु, कार टी सेल्स थेरपीसाठी 15 ते 20 लाखांपर्यंत खर्च येईल, असे प्रा. पुरवार यांचे म्हणणे आहे. पारंपरिक उपचारपद्धतीनंतरही औषधांचे दुष्परिणाम जाणवतात. कार टी सेल्स पद्धतीत त्याचे प्रमाण कमी होईल, असा दावाही संशोधकांनी केला आहे. 

सहा वर्षांपासून प्रयोग 
"कार टी सेल्स थेरपी'चा प्रयोग सहा वर्षांपासून सुरू आहे. तो किपतपत यशस्वी होते, हे पाहण्यासाठी प्रा. पुरवार यांच्या पथकाने कर्करोगग्रस्त उंदरांवर उपचार केले. त्यात त्यांना उंदराच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात यश आले. आता, या पद्धतीचा प्रयोग कर्करोग्रस्त मानवी शरीरावर करता येण्यासाठी सरकारकडून परवानग्या मिळवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मानवी शरीरावरील प्रयोगही यशस्वी होईल, असा संशोधकांचा दावा आहे. अमेरिकेत हा प्रयोग यशस्वी झाला आहे. तिथे या उपचारपद्धतीसाठी सुमारे तीन-चार कोटींचा खर्च येतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com