शेतकऱ्यांनो कृषी सल्ल्यानुसार भातपिकांवर फवारणी करा; बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीडरोगाची शक्‍यता

प्रमोद जाधव
Monday, 31 August 2020

बदलत्या हवामानाबरोबरच पाऊस सतत राहिल्याने रायगड जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना याची झळ बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या बदलत्या हवामानामुळे कीड रोगांपासून कडप्पा, नाकतोड्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कृषी सल्ल्यानुसार फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अलिबाग : बदलत्या हवामानाबरोबरच पाऊस सतत राहिल्याने रायगड जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना याची झळ बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या बदलत्या हवामानामुळे कीड रोगांपासून कडप्पा, नाकतोड्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कृषी सल्ल्यानुसार फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
रायगड जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाला. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. लावणीची कामे संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने पुन्हा जुलै महिन्याच्या अखेरीस एन्ट्री मारली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा पाऊस काही दिवस सुरूच होता. त्यानंतर मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

अधिक वाचा : कोरोना नव्हे; चक्क या कारणामुळे खालापूर तालुक्यातील गाव क्वारंटाईन

या सततच्या पावसामुळे भाताची रोपे बहरू लागली आहेत; मात्र सध्याचे हवामान जोरदार पाऊस, अधूनमधून उघडीप आणि हवेत गारवा असे आहे. या बदलत्या हवामानामुळे भातपिकावर कीड व रोगाच्या वाढीला पोषक वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे कीड रोग, काही ठिकाणी निळे भुंगेरे, तर काही ठिकाणी कडपा आणि नाकतोड्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यांसारख्या रोग निर्मूलनासाठी कृषी सहायकाच्या मार्गदर्शनानुसार फवारणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 

महत्त्वाची बातमी : पोस्ट कोव्हिड रुग्णांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, उपनगरांतील बरे झालेले रुग्ण वार्!यावर

कृषितज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला 
सध्या भातपिकावर रोगाच्या वाढीला पोषक वातावरण मिळू लागले आहे. यात खोडकिड्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. सुरुवातीला काही वेळ कोवळ्या पानांवर अळी आपली उपजीविका करते. नंतर ती खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते. त्यानंतर आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्याचे कटाक्षाने पालन करावे, असा सल्ला कृषितज्ज्ञ प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जतचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. शिवराम भगत, कीटकशास्त्रज्ञ डॉ. विनायक जालगावकर आणि विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी दिला आहे. 

अधिक वाचा : तुमच्या, आमच्या बँकांच्या EMI बद्दलची महत्त्वाची बातमी

बदलत्या हवामानामुळे भात रोपांवर कीड रोगांसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. उघडीप असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पिकांवर औषध फवारणी करावी. जेणेकरून या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. 
- पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to changing climate, paddy cultivation is at risk of pest