esakal | कल्याण-डोंबिवलीतील बाजारात म्हावऱ्याचा तोरा!
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण-डोंबिवलीतील बाजारात म्हावऱ्याचा तोरा!

समाजमाध्यमांवर चिकन आणि कोरोना विषाणू यांचा संबंध जोडला गेल्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी चिकनपेक्षा मासेखरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे यंदा म्हावऱ्याचा तोरा बाजारात काही औरच असल्याचे दिसून येत आहे. 

कल्याण-डोंबिवलीतील बाजारात म्हावऱ्याचा तोरा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कोरोना विषाणूने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. त्यामुळे याचे सावट होळी सणावर पडेल अशी शंका व्यक्त केली जात होती; मात्र कल्याण-डोंबिवलीत मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. लहान मुलांनी पालकांच्या निगराणीखाली धुळवडीचा आनंद घेतला; मात्र समाजमाध्यमांवर चिकन आणि कोरोना विषाणू यांचा संबंध जोडला गेल्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी चिकनपेक्षा मासेखरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे यंदा म्हावऱ्याचा तोरा बाजारात काही औरच असल्याचे दिसून येत आहे. 

ही बातमी वाचली का? भिवंडीत इराणी कांद्याची आवक

धुळवडीचा दिवस म्हटला की सकाळपासून मित्र-मैत्रिणी, नातेवाईक व आप्तेष्ट यांच्यासोबत मनसोक्त धुळवड साजरी केली की दुपारी किंवा रात्री गरमागरम मसालेदार चिकनचा आनंद नेहमीच घेतला जातो; मात्र यंदा बुरा न मानो कोरोना है! असा मनात निश्‍चय करून नागरिकांनी चिकन-मटणाच्या दुकानांकडे पाठ फिरवली आहे; मात्र मांसाहाराचा यथेच्छ आस्वाद घेता यावा याकरिता खवय्यांनी मासळी बाजाराकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे यंदाच्या धुळवडीला मासळी बाजाराला अच्छे दिन आले आहेत. यात प्रामुख्याने सुरमई, बांगडा, रावस, पापलेट या माशांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. 

ही बातमी वाचली का? धक्कादायक! नवी मुंबईत बलात्काराच्या दोन घटना उघड 

चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशा आशयाचे संदेश सध्या समाजमाध्यमांवर पसरत आहेत. दरवर्षी धुळवडीच्या दिवशी चिकनच्या दुकानासमोर लांबलचक रांगा लागल्याचे दृश्‍य नजरेस पडते; मात्र कोरोनाच्या भीतीने स्वस्त चिकनकडे पाठ फिरवत दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी खवय्यांनी म्हावऱ्यावर ताव मारला. भिवंडी, मुंब्रा या ठिकाणी 40 ते 70 रुपये किलो दराने चिकन विकले जात आहे. धुळवडीला लोकांची गर्दी होऊन चांगला भाव मिळेल या आशेने कल्याण-डोंबिवलीतील दुकानदारांनी हा दर प्रतिकिलो 140 रुपये ठेवला; मात्र ग्राहकांनी दुकानदारांचा भ्रमनिरास केला. 

ही बातमी वाचली का? समोर रिक्षा आल्याने बाईकचा तोल गेला आणि... 

गृहिणींचा कल कोळंबीकडे 
बाजारात 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या माशांचे वाटे विकावयास होते. तसेच कोळंबीचा एक वाटाही 100 रुपयाला असल्याने कोळंबी फ्राय, रस्सा असे अनेकविध खाद्यपदार्थ गृहिणींनी बनवण्याकडे कल दिला. 

कोरोनाबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे मनात भीती निर्माण झाली आहे. कुटुंबाच्या हट्टापायी चिकन सोडून मासे खरेदी केले. 
- दिनेश पाटील, नागरिक. 

दरवर्षी चिकन खरेदीसाठी झुंबड उडते, पण गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. धुळवडीच्या दिवशी गर्दी होईल ही आशा होती; मात्र ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. 
- रफिक शेख, चिकन विक्रेता.