'संडे हो या मंडे' आता रोज खा अंडे; ...झालंय 'हे'

'संडे हो या मंडे' रोज खा अंडे; ...कारण झालंय 'हे'
'संडे हो या मंडे' रोज खा अंडे; ...कारण झालंय 'हे'

नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या दुकानांमध्ये प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याचा गैरसमज पसरल्याने अंड्यांच्या विक्रीत घट झाली आहे. परिणामी, अंड्यांच्या किमती डझनमागे पाच रुपयांनी घसरल्या आहेत. 

हिवाळ्यात शरीराला भरपूर प्रथिने पुरवणाऱ्या अंड्यांच्या मागणीत वाढ होते. मागणीच्या तुलनेत अंड्यांची आवक कमी असल्याने या काळात अंड्यांच्या किमती प्रामुख्याने वाढतात. या वेळी मात्र अंड्यांच्या किमतीत घसरण होण्यास लोकांमध्ये पसरलेला गैरसमज कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात डझनमागे 66 रुपये मोजावे लागत होते. सध्या हेच दर 60 रुपये डझनावर आले आहे. ठाणे, मुंबई परिसरात हैद्राबाद, कर्नाटक, गुजरात व पुणे, अलिबागमधून रोज 80 ते 90 लाख अंडी येतात. सध्या आवक घटली असून 40 ते 44 लाख अंडी बाजारात दाखल होत आहेत. महामुंबई क्षेत्रात 85 टक्के अंडी पुरवठा हैद्राबादमधून होतो; तर 15 टक्के पुरवठा पुणे, अलिबागवरून होत असल्याची माहिती मुंबई एग्ज असोसिएशनमार्फत देण्यात आली. 
मार्गशीर्ष महिन्यात उपवासामुळे अंड्यांच्या किमती घटल्या होत्या; मात्र त्यांनतर पुन्हा किमतीत वाढ झाली होती. काही दिवसांपूर्वी प्लास्टिक अंडी मिळत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरला होता. याबाबत एग्ज असोसिएशनने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने प्लास्टिक अंडी नसल्याची बाब लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्राहकांचे मन वळवण्यास एग्ज असोसिएशन अपयशी ठरले. 

गेल्या आठवड्यात 5.50 रुपयांना एक अंडे विकले जात होते. ते आता 4.50 रुपयांना विकले जात आहे. अंड्याच्या किमती घसरण्यामागे घटलेली आवक कारणीभूत नसून, प्लास्टिक अंड्यांच्या गैरसमजामुळे घटलेली मागणी कारणीभूत आहे. 
- राजू शेवाळे, उपाध्यक्ष, मुंबई एग्ज असोसिएशन. 

बाजारात प्लास्टिक अंडी मिळत असल्याने मागणी कमी झाली व दर घसरले हे, तत्कालिक कारण ठरू शकेल. मात्र, दर घसरण्यामागील दुसरे एक महत्वाचे कारण आहे ते, बाहेरच्या राज्यांत जसे तमिळनाडू, कर्नाटक, हैद्राबाद येथेही अंड्याचे दर कमी झाले आहेत. तेथील दरांनुसार आपल्यालाही येथे दर स्थिर ठेवावे लागतात. तेथे दर कमी झाल्याने आपल्याकडेही दरात घसरण झाली आहे. 
- मोहम्मद अन्सारी, घाऊक विक्रेते, झिशान एग ट्रेडर्स. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com